नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे मागील 24 तासांमध्ये 16 जणांचा मृत्यु झाला आहे. तर, दाट धूक्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, कडाक्याच्या थंडीचा प्रभाव सार्वजनिक वाहतूकीवर देखील पडला आहे. घनदाट धूक्यामुळे विमान आणि रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाल्याचे सुत्रांनी सांगितले. थंडीमुळे बाराबंकीमध्ये पाच लोकांचा मृत्यु झाला आहे तर, फतेहपुरमध्ये तीन व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. बस्तीमध्ये तीन तसेच कुशीनगर आणि सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येकी 2 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर, चंदौलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.
लखनऊच्या चौधरी चरण सिंह विमानतळावरील अधिका-याने सांगितले की, एअर इंडिया, जेट एअरवेज आणि इंडिगो एअरलाइंसचे कमीत कमी 3 विमाने निर्धारित वेळेच्या 90 मिनिटे उशिराने उड्डान करत आहेत. तर अनेक रेल्वे गाड्या त्यांच्या वेळेपेक्षा 3 ते 10 तास उशीराने धावत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारचे तापमान 8.8 डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे.