आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1993 Bombblast At Mumbai Actor Sanjay Dutt\'s Gets 5 Year Jail

मार्कंडेय काटजुंनी घेतली संजय दत्तची बाजू, राज्‍यपालांकडे मागितली माफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा युक्तिवाद फेटाळून सुप्रीम कोर्टाने त्याला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. 'एके 56'सारखे घातक शस्त्र बेकायदा हाताळल्याबद्दल 2007 मध्ये टाडा कोर्टाने त्याला 6 वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा 5 वष्रे केली. संजय दत्तने या प्रकरणी दीड वर्ष तुरुंगवास भोगलेला असल्याने आणखी साडेतीन वष्रे त्याला तुरुंगात काढावी लागतील. त्याला शरण येण्यासाठी कोर्टाने एक महिन्याचा कालावधी दिला आहे. निकाल जाहीर झाला तेव्हा संजय घरी होता, तर बहीण प्रिया दत्त कोर्टात उपस्थित होती. तर प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष मार्कंडेय काटजुंनी संजय दत्तची बाजू घेतली आहे. त्‍याची शिक्षा माफ करावी, अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

याकूब मेमनची फाशी कायम, 10 जणांना फाशीऐवजी जन्मठेप- मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब मेमन याची फाशी कोर्टाने कायम ठेवली, तर 10 आरोपींची फाशी जन्मठेपेत बदलली. 14 वष्रे चाललेल्या खटल्यानंतर टाडा कोर्टाने 100 आरोपींना शिक्षा ठोठावली होती. यात 11 जणांना फाशी, 17 जणांना जन्मठेप सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने 17 जणांची जन्मठेप मात्र कायम ठेवली आहे.

बाबरी मशीद पतनानंतर 1993 मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटांत 257 लोक मारले गेले होते.

सुनील दत्त म्हणाले होते.. ..पण मी एक पिता आहे- 'सर्व झूठ आहे. एखादा बाबा, फकीर असो वा कुणी कुठे जा म्हणून सांगितले की मी प्रार्थनेसाठी आर्जव घेऊन जात आहे. कुणी म्हणतो, 3 दिवसांत सुटेल. कुणी 7 दिवसांत सुटेल अशी आशा दाखवतो. सुनावणी दीड महिन्यांनंतर आहे. सब झूठ बोल रहे हैं.. माहीत आहे. काय करू, मी पण एक पिता आहे.. '
- संजय तुरुंगात होता तेव्हा सुनील दत्त पीर-फकिराच्या चौकटीवर प्रार्थना करत होते. याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी या शब्दांत उत्तर दिले होते.

खलनायकाचे दोष मुन्नाभाईने बदलले- 'खलनायक' प्रदर्शित झाला तेव्हा तो पहिल्यांदा तुरुंगात गेला. चित्रपटात त्याने केलेली भूमिका प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, मुन्नाभाईच्या चित्रपटांनी त्याला प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये तो तुरुंगात गेला तेव्हा अनेकांना रडू कोसळले होते. निकाल देताना तेव्हा न्यायाधीशांनीही त्याच्या भूमिकेमुळे आपण प्रभावित झाल्याचे म्हटले होते.

पाकिस्तानात रचला मुंबई स्फोटांचा कट- मुंबईतील या बॉम्बस्फोटांबद्दल सुप्रीम कोर्टाने पाकला जबाबदार धरले. कट पाकमध्येच रचला गेल्याचे सांगून दाऊद, याकूब हे खरे सूत्रधार, तर उर्वरित आरोपींमार्फत त्यांनी कट प्रत्यक्षात उतरवल्याचे कोर्टाने नमूद केले.

तीन पर्याय- निकालावर फेरविचार याचिका दाखल करू शकतो
- सुप्रीम कोर्टाच्या उच्च पीठासमोर आव्हान देऊ शकतो
- राष्ट्रपतींकडे माफीसाठी याचना करू शकतो

जेलमध्ये जावेच लागेल- संजय दत्त 26 एप्रिल 1993 रोजी गुन्हा कबूल केल्यानंतर सुमारे 16 महिने तुरुंगात होता.
- 2007 मध्ये टाडा कोर्टाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली. 38 दिवसांनी तो जामिनावर सुटला.
- आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपिलाचा पर्याय असला तरी त्याला सरेंडर व्हावेच लागेल. म्हणजेच तुरुंगवास अटळ.

अनेक चित्रपट अडकले- संजय दत्त पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर सुमारे 250 कोटींचे चित्रपट अडकून पडतील. यात पुलिसगिरी, जंजीर, घनचक्कर, पीके आणि उंगली या चित्रपटांचा समावेश आहे.

दयेची याचना..

मी बदललोय, माझ्या पित्याची प्रतिष्ठा होती- मला तीन मुले आहेत. माझ्या वडिलांची समाज आणि राजकारणात खूप प्रतिष्ठा होती. आता मी पूर्ण बदललो आहे. - कोर्टात संजयच्या वतीने वकिलाने केलेले आर्जव

न्यायमूर्ती कठोर- प्रतिष्ठेने काय होते, शिक्षा भोगावीच लागेल- दत्त कुटुंबाची प्रतिष्ठा असली तरी बेकायदा शस्त्र बाळगावीत, असे नाही. संजय दत्तला शिक्षा भोगावीच लागेल. - न्यायमूर्ती पी. सदाशिवम आणि न्या. बी. एस. चौहान

..संजू ढासळला- माझी पत्नी-मुलांना शिक्षा का?- गेल्या 20 वर्षांपासून मी या दुष्टचक्रातून जात आहे. मी पुरता ढासळलो आहे. माझी मुले आणि कुटुंबालाही याबद्दल शिक्षा भोगावी लागेल.- निकालानंतर बोलताना संजय दत्त

संजूबाबाच्या मदतीला काटजू- प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी संजय दत्तची बाजू घेतली आहे. संजयने मागील 20 वर्षात खूप काही सोसले आहे. या काळात तो जेलमध्ये गेला, कोर्टात गेला, सुनावण्यांना हजर राहिला, त्याला परदेशात शुटिंगपासून जाण्यास रोखले, अगदी त्याला देशातील बॅंका लोनही देत नव्हत्या. म्हणूनच त्याने मागील काळात खूप काही सोसले आहे असे मला वाटते. याचबरोबर संजय दत्त हा एक चांगल्या घरातील मुलगा आहे. त्याचे आई वडिल सुनील दत्त आणि नर्गिस यांनी समाजासाठी खूप योगदान दिले आहे. या दोघांनी सीमेवर जावून जवानांचे नैतिक मनोधैर्य वाढवले. संजयने नंतरच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर चित्रपट काढला. जे देशाचे पितामह होते. त्याला महाराष्ट्र सरकारने व राज्यपालानी मदत करायला हवी. कारण त्याला दहशतवादी ठरवण्यात आले आहे. मात्र त्याचा बॉम्बब्लॉस्टमध्ये काहीही हात नाही. तसेच त्याला दोन मुले असून त्यांचा व पत्नीचा विचार करता त्याला माफ करायला हवे. शिवाय त्याने तुरुंगात 18 महिने काळ घालवला असल्याचे मतही काटजू यांनी जोडत संजय दत्तवर कृपा झाली पाहिजे, असे मत स्पष्ट शब्दात मांडले आहे.