आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1993 Bombblast At Mumbai Actor Sanjay Dutt\'s In Tension

1993 ब्लास्ट: अभिनेता संजय दत्तला पाच वर्षां‍ची शिक्षा, याकूब मेननला फाशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- सन 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जबरदस्त हादरा बसला आहे. सुप्रीम कोर्टाने संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर संजय दत्तला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी याकूब मेमन यांची फाशी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. मात्र अन्य दहा आरोपींची फाशीची शिक्षा कोर्टाने जन्मठेपेत बदलली आहे.

याशिवाय कोर्टाने 19 पैकी 17 जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. एका आरोपीची जन्मठेप १० वर्षे कैदेत बदलण्यात आली. तर एका महिला आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहे.

याकूब मेमन हा सर्वात मोठा गुन्हेगार असून तोच या ब्लास्टचा तो 'मास्टर माईंड' असल्यामुळे त्याची फाशी कायम ठेवण्यात आल्याचेही कोर्टाने निकाल देताना म्हटले.

याप्रकरणी 'टाडा न्यायलयाने योग्य ती प्रक्रिया पूर्ण करूनच निकाल दिल्याचे सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल देताना म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे टाडा कोर्टाच्या निकालावर तांत्रिक दृष्ट्या आक्षेप घेणार्‍या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर संजय दत्तला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. त्याला कमीत कमी साडेतीन वर्षे तुरूंगात काढावे लागणार आहे. संजय याने यापूर्वी दीड वर्षे शिक्षा भोगली होती. संजयला चार आठवड्यात पोलिसांना शरण जावे लागणार आहे. कोर्टाने निकाल जाहीर करताच संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्‍त यांना अश्रु आवरता आले नाही. यावेळी संजयची पत्नी मान्यताही उपस्थित होती.

यापूर्वी टाडा न्यायालयाने संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सुप्रीम कोर्टाने त्यात एक वर्ष कपात करून संजयला पाच वर्षांच्या शिक्षेवर शिक्का मोर्तंब केला.

दुसरीकडे, या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्‍यात आली आहे. निमलष्करी दलालाही पाचारण करण्‍यात आले आहे.