नवी दिल्ली- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्यसूत्रधार याकूब अब्दुल रजाक मेमन याच्या फाशीला 28 जानेवारी 2015 पर्यंत सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब मेमन हा एकमेव दोषी आहे. मेमनला 1994 मध्ये काठमांडू एअरपोर्टवर अटक करण्यात आले होते.
याकूब मेमन याच्या विनंती अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटांनंतर मेमन याला अटक झाली. तेव्हापासून तुरुंगात आहे. जन्मठेपेपेक्षाही जास्त शिक्षा मेमन याने भोगली आहे. त्यामुळे मेमन याचा मृत्युदंड रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद मेमन याच्या वकिलांनी केला. यावर सुप्रीम कोर्टाने स्थगितीचे आदेश दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने एसटीएफ महाराष्ट्र आणि सीबीआय नोटीस देखील बजावली आहे.
मेनन हा 1996 पासून स्कित्सोफीनिया आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या अर्जाचा विचार व्हावा, अशी विनंतीही कार्टाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले होते. 'टाडा' कोर्टाने याकूब मेमनसह त्याच्या अन्य सहकार्यांना दोषी ठरवले होते. मेमन याला एकट्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
यापूर्वी याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने जुलै महिन्यात स्थगिती दिली होती. मेमनने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती. न्यायमूर्ती जे.एस. खेहर आणि सी. नागप्पन यांच्या न्यायपीठासमोर मेमनकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ उपमन्यू हजारिका यांनी युक्तिवाद मांडला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन अटक करणे चुकीचेच- सुप्रीम कोर्ट