नवी दिल्ली - पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी महाराष्ट्राला १५०० कोटी तर पाणलोट व्यवस्थापनासाठी ९०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची सोमवारी भेट घेतली. या वेळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मजूर व कंत्राटदारांची देणी पूर्ण देण्यासाठी राज्याला १ हजार ५०० कोटी रुपये निधी मिळणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पंकजा मुंडे आणि दीपक केसरकर यांनी जेटलींकडे केली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे केंद्र शासनाने एकूण मंजूर प्रकल्पाच्या ५० % निधी अग्रिम स्वरूपात राज्यांना देणे आवश्यक असल्याने एकूण १ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी समर्थनीय असल्याचे उभय मंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या एकात्मिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमासाठी राज्याला ९०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही मंत्र्यांनी जेटलींकडे केली.