नवी दिल्ली - ट्रेकिंगवर निघालेले आठ देशांचे २० मित्र लडाखमधील गावांना विजेने झळाळण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत. हा चमू ९ ऑगस्टपासून सुरू होणा-या ७०० चढाईदरम्यान मारखा व्हॅलीच्या उमलुंग गावातील ८ घरे आणि टेचा मठाला वीज सुविधा उभारून देणार आहे. तसेच लेहच्या थर्ड पोल ई-बेसमध्ये पहिली रोबोटिक प्रयोगशाळाही उभारली जाणार आहे.
डेन्मार्कचे स्कीइंग विश्वविजेते, पेरू, ओमानच्या उद्योजकांचा चमूत समावेश आहे. ग्लोबल हिमालयन एक्सपीडिशन म्हणजेच जीएचई ही मोहीम दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती. २०१३ मध्ये ही दोस्त मंडळी लडाखच्या जंस्कार व्हॅलीत ट्रेकिंगसाठी गेली होती. त्यांनी एका गावात रात्र घालवली. तेथे वीज नव्हती. परतताना त्यांनी
आपल्याकडचे सोलार लँप गावक-यांना दिले.
गेल्या वर्षी १० देशांचे हे २४ मित्र त्याच भागात पुन्हा ट्रेिकंगसाठी निघाले. किमान एक गाव उजळवायचे हा निर्णय झाला. ते तीन सोलार मायक्रो ग्रीड व फिटिंगचे सामान सोबत घेऊन गेले. ३ दिवसांच्या कठीण चढाईनंतर ते लडाखचे शेवटचे गाव सुम्दा चेन्मो येथे पोहोचले. १४ हजार फुटांवरील या ११ व्या शतकातील गावातील सर्व ११ घरे व एका बौद्ध मठाला त्यांनी सौर ऊर्जेने उजळवून टाकले. पारस लुंबा हे टीमचे लीडर आहेत. तेच जीएचईचे संस्थापकही आहेत. कॉर्पोरेट जॉब सोडून ते साैरऊर्जा व गावांच्या विकासावर काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, सुम्दा चेन्मो गावातील प्रत्येक घरात केरोसीनचा वार्षिक वापर ७० लिटरने घटला आहे.
गावकरी चार तास जास्त काम करतात. सर्व सोबत बसून टीव्हीवर चित्रपट पाहतात.
संध्याकाळ होताच आपोआप दिवे सुरू व सकाळी बंद होतात. दोन दिवसांचा बॅकअप असतो. सोलार ग्रीडमध्ये पाच वर्षे बिघाड होणार नाही. टीमने या गावला होम स्टे डेस्टिनेशन बनवले आहे. ट्रेकिंगसाठी आलेली मंडळी अाता याच गावात थांबते. त्यांना मोबाइल चार्जिंगसह इतर सुविधाही मिळतात. जीएचईने २०१३ मध्ये लेहमध्ये उभारलेल्या शैक्षणिक केंद्रात डिजिटल लायब्ररी, टॅब, इंटरनेटसारख्या सुविधा आहेत.