नवी दिल्ली - २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून जाहीर होणार आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे चार दिवसांत ही घोषणा होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी येथे आयोजित गीता प्रेरणा महोत्सवात ही माहिती दिली.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांपूर्वी जागतिक योग दिन साजरा करावा, असे आवाहन जागतिक समुदायाला केले होते. त्यास १७० देशांचा पाठिंबा मिळाल्याचे स्वराज यांनी गीता प्रेरणा महोत्सवात सांगितले. भगवद्गीतेला ५१५१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा महोत्सव घेण्यात आला आहे. योगगुरू रामदेवबाबाही या वेळी उपस्थित होते.
मंत्रिपदाची आव्हाने पेलण्यासाठी गीतेची मदत
स्वराज म्हणाल्या की, मी परराष्ट्रमंत्री म्हणून नव्हे तर गीतेनुसार जीवन जगणारी साधक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. गीतेमुळेच कुठल्याही अडचणींशिवाय मला परराष्ट्र मंत्रिपदाच्या आव्हानांचा सामना करणे शक्य होत आहे. गीता हा जीवनमार्ग आहे. जीवनातील सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे गीतेत आहेत.
गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा : विहिंप
सरकारने गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावे, अशी मागणी विहिंपचे नेते अशोक सिंघल यांनी केली. स्वराज म्हणाल्या, मोदींनी ओबामा यांना गीता भेट देऊन त्यास अनौपचारिक राष्ट्रीय दर्जा दिला आहे.
पुढील वर्षी हरियाणात गीता जयंती वर्ष
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणात पुढील वर्षी गीता जयंती वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. त्यानिमित्त राज्यातील कुरुक्षेत्र येथे मोठा समारंभ आयोजित केला जाईल.