मनाली - हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात थालोट गावामध्ये बियास नदीमध्ये हैदराबादहून आलेले सुमारे 24 विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली आहे. लार्जी प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने, पाण्याची पातळी वाढली आणि हे विद्यार्थी त्यात वाहून गेल्याचे इतर विद्यार्थ्यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत असून, पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
हैदराबादच्या व्हीएनआर इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे हे विद्यार्थी सहलीसाठी हिमाचल प्रदेशात आले होते. ही घटना घडली त्यावेळी हे सगळे विद्यार्थी नदीच्या खो-यामध्ये फोटोग्राफी करत होते. या 24 विद्यार्थ्यांशिवाय 20 विद्यार्थी बसमध्येच बसून राहिले होते. ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेने सगळेच धक्क्यात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 24 विद्यार्थ्यांमध्ये 18 मुले आणि सहा मुलींचा समावेश आहे. हे सर्व मंडीहून मनालीकडे जात असताना त्यांना रस्त्यामध्ये नदी दिसल्याने त्यांनी खाली उतरून फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ते नदीच्या खो-यात पोहोचताच मोठ्या प्रमाणावर पाणी आले आणि ते सर्वजण वाहून गेले. लार्जी प्रकल्पामधील अधिका-यांनी पाणी सोडण्याआधी कोणत्याही प्रकारची सूचना दिली नव्हती असे सुत्रांनी सांगितले आहे.
या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात येत आहे. प्रशिक्षित जीवनरक्षकांची टीम या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर पोलिस आणि स्थानिक लोकही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यात मोठ्याप्रमाणावर अडचणी येत होत्या. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हे सर्व विद्यार्थी किमान 20 किलोमीटर अंतरापर्यंत वाहून गेले असल्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी, थंडी आणि पाण्याचा वेग यामुळे विद्यार्थी जिवंत सापडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या नदीच्या खो-याची खोली सुमारे 10 ते 50 फूट आहे. तसेच पाण्यात अनेक ठिकाणी भवरेही तयार झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक धोका असल्याचेही काही जणांनी सांगितले. या पाण्यात शोध घेण्यासाठी केवळ बोटींद्वारे शक्य असल्याचे सुत्रांनी सांगितले.
संतप्त लोकांनी हायवे रोखला
या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी मंडी मनाली मार्ग पूर्णपणे बंद करून टाकला होता. त्यामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. थालोट येथील रहिवासी आणि आसपासच्या लोकांनी लार्जी प्रकल्पाचे अधिकारी यासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.