नवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआयने पंतप्रधान मनमोहनसिंग यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात प्रत्येक निर्णय पंतप्रधानांच्या सहमतीने घेतल्याचे सोमवारी सांगितले. यानंतर दुसर्या दिवशी भाजपने ही मागणी केली आहे.
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या खटल्याची सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाने सोमवारी आरोपींचे जबाब नोंदवून घेतले. राजाचा जबाब धक्कादायक असल्याचे सांगत भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, सीबीआयने पंतप्रधानांची चौकशी करावी. त्यांची चौकशी न झाल्यास तपास पूर्ण होणार नाही. या घोटाळ्यात पंतप्रधानांचाही सहभाग आहे हे आता स्पष्ट झाले आहे. राजा यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्यात पंतप्रधानांना ओढण्याचा प्रयत्न केला. राजांनी नोंदवलेला जबाब गंभीर आहे. हजारो प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी पंतप्रधानांच्या सहमतीनेच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी या मुद्दय़ावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत जावडेकर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याचाही उल्लेख केला.
सुनील दत्त यांचे संयोजन समितीचे अध्यक्षपद एका दिवसात काढून त्यांच्या जागी सुरेश कलमाडी यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधानांकडे कोळसा मंत्रालय असताना कोळसा घोटाळा झाला. पंतप्रधानांच्या आदेशानुसार कोळसा खाणीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.