आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2G Scam: JPC Clears Manmohan Singh, Chidambaram; Pins Rs 40000 Crore Loss On NDA

2जी स्पेक्ट्रम घोटाळा: पंतप्रधान, चिंदबरम यांना क्लिनचीट; ए.राजा सूत्रधार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) क्लीनचीट देण्यात आली असून माजी दूरसंचारमंत्री ए.राजा यांच्या डोक्यावरच खापर फोडले आहे.

जेपीसीने तयार केलेल्या मसुद्यात घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाची स्पेक्ट्रम वितरणासंदर्भात दिशाभूल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे स्पेक्ट्रम वितरणात पारदर्शकता ठेवण्याचे पंतप्रधान सिंह यांनी दिलेले निर्देश तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी पाळले नाही. एवढच नाही तर या प्रकरणी कॅगच्या अहवालावरही संयुक्त संसदीय समितीने ताशेरे ओढले आहेत.

जेपीसीने तयार केलेल्या मसुद्यात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या भूमिकावरही सवाल उपस्थित केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 23 एप्रिल रोजी जेपीसीच्या सदस्यांसमोर हा मसुदा सादर करण्‍यात येणार आहे. 25 एपिलला जेपीसीची अंतिम आणि महत्त्वाची बैठक होणार असून मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मसुद्यानुसार सरकारी धोरणांचे ऑडिट करण्याचा कॅगला कुठलाही अधिकार नाही. सरकारी धोरणांमुळे झालेल्या नुकासानीची आकडेवारी काढण्याचाही कॅगला कुठालाही अधिकार नसल्याचे अहवालाच्या मसुद्यात म्हटले आहे.
त्यामुळे टू जी प्रकरणी झालेल्या एक लाख 76 हजार कोटींच्या नुकसानाच्या आकड्याला कुठलाही आधार नसल्याचेही जेपीसीने म्हटले आहे.


दरम्यान, 30 सदस्यीय समितीत 12 यूपीएचे असून त्यात 11 कॉंग्रेसचे तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य आहे. दिलेल्या अहवालाला मंजुरी मिळण्यासाठी जेपीसीच्या 16 सदस्यांचे पाठिंबा आवश्यक आहे. परंतु या मसुद्याला विरोधी पक्षांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.