आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीईटी’ला तात्पुरती सवलत, \'नीट-1\' दिलेल्यांना पुन्हा संधी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्या विद्यार्थ्यांनी मे रोजी नीट-१ची परीक्षा दिली आहे अशांना २४ जुलै रोजी होणाऱ्या नीट-२च्या परीक्षेला बसता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हे स्पष्ट केले. वेगळी मेडिकल प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या अर्जांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. केवळ एका सत्रासाठी राज्यांना वेगळी प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे संकेतही दिले.

महाराष्ट्रासह विविध राज्यांत वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) तात्पुरती सवलत देण्याचे सूचक मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षी घेण्यात आलेल्या सीईटीनुसार प्रवेश प्रक्रीयेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयालाकडे २ दिवसांची वेळ मागितल्यामुळे यावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

नीटबाबत गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची बाजू ऐकन घेतल्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीने (आयएमसीआय) बाजू मांडण्यात आली. न्यायमूर्ती ए.आर.दवे, ए. के. गोयल आणि शिवकीर्ती सिंह यांच्या पीठापुढे बाजू मांडताना कौन्सिलने म्हटले, "देशातील विविध राज्यांच्या वतीने वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेला या वर्षी (वर्ष २०१६) नीटमधून सवलत देता येऊ शकते. मात्र, खासगी महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांना नीटमधून सवलत देण्यात येणार नसल्याचे मत कौन्सिलच्या वतीने मांडण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ मे २०१६ रोजी घेण्यात आलेल्या सीईटीच्या नियोजनानुसार निकाल व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नीटबाबत विविध राज्यांचे शिक्षणमंत्री व अधिकारी यांची येत्या शनिवारी आणि रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीतून पुढे येणाऱ्या सूचनांनुसार सरकारला आपली बाजू मांडता येईल व नीटबाबत निर्णय घेता येईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. पुढील सुनावणी सोमवारी ९ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्राची मागणी : शुक्रवारच्या सुनावणीवेळी राज्याचे मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर उपस्थित होते. तत्पूर्वी, महाराष्ट्र शासनाची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ही कायद्यानुसार वैध असल्याने राज्याला ‘नीट’मधून सवलत देण्यात यावी,अशी बाजू महाराष्ट्र शासनाच्यावतीने गुरुवारी मांडण्यात आली.

सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष
वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षा यंदाच्या वर्षीपासून लागू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. सदर निर्णय तात्काळ लागू करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याने महाराष्ट्र शासनाने २ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. दिनांक ६ व ७ मे २०१६ च्या सुनावणी नंतर या प्रकरणात ९ मे २०१६ रोजी दुपारी २ वाजता सुनावणी सुरु होईल.

पुढे वाचा, सीईटीस सुप्रीम कोर्ट सकारात्मक : तावडे
बातम्या आणखी आहेत...