नवी दिल्ली- केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी तब्बल 31 एअर कंडिशनर्स, 25 हिटर्स, 15 डेझर्ट कुलर्स, 16 एअर प्युरिफायर्स आणि 12 गिझर्स बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुभाष आगरवाल यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागविली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित या मुख्यमंत्री असताना 3, मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी राहात होत्या. आता सध्या या बंगल्यात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह राहात आहेत. या बंगल्यात कमीत कमी 31 एअर कंडिशनर, 15 डेझर्ट कूलर, 25 हीटर, 16 एअर प्यूरीफायर, 12 गिझर्स तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरण बसवण्यात आले होते. यासगळ्या वस्तूंसाठी तब्बल 16.81 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला होता. विशेष म्हणजे शीला दीक्षित यांच्या आदेशावरून या सर्व इलेक्ट्रिक वस्तू बसविण्यात आल्या होत्या, असे माहिती अधिकारात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक वस्तू विविध सरकारी कार्यालयांना गरजेनुसार उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बंगल्याच्या नूतनीकरासाठी 35 लाखांचा खर्च...
तीनदा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे 1920 मध्ये बांधण्यात आलेला बंगला रिकामा करून द्यावा लागला होता. तीन एकर जागेवर हा भव्य बंगला बांधण्यात आला आहे. नंतर शीला दीक्षित फिरोजशाह रोड वरील दोन हजार वर्ग फुट जागेत तीन बेडरूम असलेल्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्या होत्या. शीला दीक्षित यांनी रिकामा केलेला बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या बंगल्यात राहायला आले आले होते.
(फाईल फोटो: शीला दीक्षित)