आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेड न्यूज प्रकरणात 350 जणांना नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेड न्यूज प्रकरणात 350 जणांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवला आहे. निवडणुकीच्या काळात आयोगाच्या देखरेख पथकाकडून देशभरात सुमारे 216 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाचे कार्यकारी संचालक अक्षय राऊत यांनी सांगितले की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून शुक्रवारपर्यंत पेड न्यूजची 368 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी 198 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले असून त्यात आचारसंहितेचे तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने तयार केलेल्या नियमावलींचे उल्लंघन झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. प्रेस कौन्सिलच्या दिशानिर्देशांचा विचार करता काही वृत्त व जाहिराती या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आहेत. यात सर्वाधिक 66 प्रकरणे ही महाराष्ट्रातील असून त्यासंदर्भात संबंधित उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात 24 कोटी रुपये जप्त
महाराष्ट्राखालोखाल राजधानी दिल्लीत पेड न्यूजची 60 प्रकरणे आढळून आली आहेत. उत्तर प्रदेश व हरियाणात अशा स्वरूपाच्या प्रत्येकी 41 केसेस आढळल्या आहेत. निवडणूक आयोगाने प्रचार काळात देशभरात 2160 कोटी रुपये जप्त केले. त्यात सर्वाधिक 92 कोटी रुपये आंध्र प्रदेशात पकडण्यात आले. त्याखालोखाल 24 कोटी रुपये महाराष्ट्रात जप्त करण्यात आले.

प्रचारातील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयोगाकडून उमेदवारांचा खर्च व बँक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी आयकर विभाग तसेच सीमा शुल्क खात्याचीही मदत घेतली जात आहे.