आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 46 Abducted Nurses Freed In Iraq, Will Be Back Home Today

भारतीय परिचारिकांची अग्निपरीक्षेतून सुटका; आज कोचीला पोहोचणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ कोची - आयएसआयएस या सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमध्ये ओलीस ठेवलेल्या 46 भारतीय परिचारिकांची नाट्यमय घडामोडींनंतर सुटका केली असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान शुक्रवारी इर्बिलला रवाना करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांनी सुटका केलेल्या सर्व परिचारिका शनिवारी सकाळी कोचीला पोहोचण्याची शक्यता आहे. या सर्व परिचारिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध दहशतवाद्यांनी अज्ञात स्थळी नेले होते. त्यांची दहशतवाद्यांनी सुटका केली आहे. त्या इर्बिलमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. उत्तर इराकमध्ये असलेले इर्बिल हे शहर कुर्दीश प्रांताची राजधानी आहे. या सर्व परिचारिका माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे गाव तिक्रितमधील रुग्णालयात नोकरीस होत्या. 9 जून रोजी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी तिक्रितवर हल्ला चढवल्यापासूनच या परिचारिकांची अग्निपरीक्षा सुरू झाली होती.

मोसूलला नेले अन् सुरक्षित सोडले
तिक्रितमधील या परिचारिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध एका वाहनात बसवून मोसूलला नेण्यात आले होते. तेथे त्यांना एका इमारतीच्या तळमजल्यात ठेवण्यात आले होते. मोसूल तिक्रितपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांनी परिचारिकांबाबत सौम्य भूमिका घेतली आणि त्यांना सुखरुप सोडण्याचा शब्दही दिला होता.

बोइंग 777 रवाना
इर्बिलमधून परिचारिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे बोइंग 777 हे विमान शुक्रवारी सायंकाळी रवाना झाले. 300 प्रवासी बसण्याची या विमानाची क्षमता आहे. इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाने तीन मोठी विमाने आणि चालक दल सज्ज ठेवलेले आहे.

एकत्रित प्रयत्नांचे यश
भारत सरकार, बगदादमधील भारतीय दूतावास, राज्य सरकार यांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे परिचारिकांची सुटका झाली. त्या शनिवारी सकाळी कोचीला पोहोचतील,असे केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी परिषदेत सांगितले.
स्थलांतर कायदा कडक करा : अ‍ॅम्नेस्टी
हिंसाचारग्रस्त इराकमध्ये परिचारिकांना ओलीस ठेवल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून स्थलांतर कायदा आणखी कडक करा, असे आवाहन अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केंद्र सरकारला केले आहे. व्हिसामधील घोटाळे आणि सौदी अरबमध्ये भारतीयांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन याबाबतचा संशोधन अहवाल अ‍ॅम्नेस्टीने सादर केला. या परिचारिकांना वेळेवर पगार देण्यात आला नसल्यामुळेच त्या इराकमध्ये अडकून पडल्या, असे या अहवालात म्हटले आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)