आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 84 Riot : Shikh Community Agitation Befor Congress Headquator In Delhi

84 ची दंगल: दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोर शीख समुदायाची उग्र निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विविध शीख संघटनांनी गुरुवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर उग्र निदर्शने करीत दिल्ली दणाणून सोडली. सन 1984च्या शीखविरोधी दंगलीत सहभागी असणा-या काँग्रेस नेत्यांची नावे सांगा, अशी मागणी त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.


काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी शीख दंगलीत काँग्रेस नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली दिली होती. या वादग्रस्त वक्तव्यावर शीख समुदायाने शुक्रवारी निदर्शने केली. या वेळी काँग्रेसविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. 84च्या दंगलीतील काँग्रेसच्या सहभागाबद्दल सीबीआयने राहुल गांधी यांचीही चौकशी करावी, अशी मागणी विविध शीख संघटनांनी केली. 24 अकबर रोड स्थित काँग्रेस मुख्यालयासमोर सकाळी सुमारे 200 निदर्शक गोळा झाले. त्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; परंतु बॅरिकेड्स तोडून ते मुख्यालयाच्या दिशेने धावले. अनेक निदर्शकांना या वेळी ताब्यात घेण्यात आले. या वेळी दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.


राहुलच्या बचावासाठी सरकार धावले
एसआयटीची मागणी जुनीच : दिल्ली सरकारने दंगलीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात निदर्शकांना छेडले असता गेल्या 25 वर्षांपासून आम्ही एसआयटीची मागणी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री केजरीवालांना खरोखरच तळमळ वाटत असल्यास त्याचे स्वागतच आहे; परंतु याप्रकरणी त्यांनी राजकारण करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंजाबच्या लुधियाना शहरातही शिरोमणी अकाली दलाच्या युवक शाखेने दंगलीत सहभागी नेत्यांची नावे जाहीर करण्याची मागणी राहुल यांच्याकडे केली आहे.
भरपाई देण्याचा सरकारचा विचार : शीख दंगलीचा वाद नव्याने सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार दंगलग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा विचार करीत आहे. सन 84 ची दंगल दुर्दैवी होती. पंतप्रधानांनी संसदेत व संसदेबाहेर अनेक वेळा माफी मागितली आहे. यासंबंधी न्यायालयात खटले सुरू आहेत, असे माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले.


अमेरिकी कोर्टात राहुलच्या हजेरीची मागणी
शीख दंगलीप्रकरणी अमेरिका स्थित संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने अमेरिकी न्यायालयात राहुल गांधी यांना हजर करण्यासाठी अपील करणार असल्याचे सांगितले. राहुल यांना समन्स पाठवण्यासाठी ही संघटना अर्ज करणार आहे.संघटनेने अमेरिकेत काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात मानवी हक्क उल्लंघनाचा खटला दाखल केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे अमेरिकेतील वकील रवी बत्रा यांनी संघटनेच्या प्रयत्नांना विरोध केला जाईल, असे सांगितले.