आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना कायमचाच ब्रेक! वाहन स्क्रॅप धोरण मंजूर, एप्रिल 2020 पासून लागू होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारच्या उच्चस्तरीय समितीने शुक्रवारी वाहन स्क्रॅप धोरणास तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानुसार आता १ एप्रिल २०२० पासून २० वर्षांपेक्षा जुनी ट्रक, बस, टॅक्सीसारखी व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेइकल्स) चालवता येणार नाहीत. देशात सध्या २ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त व्यावसायिक वाहने २० वर्षांपेक्षा जुनी आहेत. एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत स्क्रॅप धोरणाला मंजुरी देण्यात आली. बैठकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्यासह वित्त, अवजड उद्योग आणि स्टील मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते. 


अधिकाऱ्याने सांगितले की, हे धोरणात्मक पाऊल असल्यामुळे प्रस्ताव कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले जाऊ शकतो. अर्थ मंत्रालयाने आधीच सहमती दर्शवलेली आहे. स्टील मंत्रालय स्क्रॅप सेंटरबाबत तर पर्यावरण मंत्रालय पर्यावरण नियमांबाबत शिफारशी करणार आहे. रस्ते परिवहन मंत्रालय याबाबत तीन महिन्यांत अधिसूचना जारी करू शकते. रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी नुकतेच म्हणाले होते की, वाहन प्रदूषण रोखण्यासाठी स्क्रॅप धोरण राबवणे अत्यंत गरजेचे आहे. 

 

नव्या वाहनांच्या किमतीत १५-२० % फायदा शक्य
- प्रस्तावित धोरण आता जीएसटी परिषदेकडे पाठवले जाईल. भंगारात काढलेल्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी केल्यास जीएसटीचा दर २८ टक्क्यांऐवजी १८ % करण्यात यावा, अशी मागणी परिषदेकडे करण्यात आली आहे.
- जुनी वाहने भंगारात काढून नवीन वाहन खरेदी केल्यास त्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. यासाठी भंगारात काढलेल्या वाहनाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...