आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 84th Convocation Of Congress; Rahul Gandhi Will Choose 24 Members Of The Executive

काँग्रेसचे 84 वे महाधिवेशन; कार्यकारिणीचे 24 सदस्य राहुल गांधीच निवडणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अध्यक्ष राहुल गांधी आता काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) सर्व सदस्यांची निवड करतील. म्हणजे कार्यकारिणीत कोणत्या नेत्यांचा समावेश असेल याचा निर्णय स्वत: राहुलच करतील. काँग्रेसच्या ८४ व्या महाधिवेशनात रविवारी याबाबत सहमती झाली. एआयसीसीच्या सदस्यांनी हा अधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधींना दिला जाण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर केला. राहुल यांना २०१९ साठी आपला चमू निवडता यावा यासाठी हे करण्यात आले. राहुल अध्यक्ष झाल्यापासून कार्यकारिणी भंग आहे. काँग्रेसमध्ये कार्यकारिणी महत्त्वाचे निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. कार्यकारिणीत अध्यक्षांसह एकूण २५ सदस्य असतात. त्यात १२ सदस्य नियुक्त तर १२ सदस्यांची निवड होत होती. पण राहुल गांधी सर्व २४ सदस्यांची नियुक्ती करतील. अर्थात याआधीही अनेकदा काँग्रेसच्या अध्यक्षांनीच सदस्यांची नियुक्ती केलेली आहे.  एआयसीसीच्या बहुतांश सदस्यांचे म्हणणे होते की, सध्या पक्षाला राहुल यांच्या नेतृत्वात एकजूट होऊन मोदींशी सामना करायचा आहे. त्यामुळे पक्षात कार्यकारिणीच्या १२ जागांसाठी निवडणूक ठीक नाही.

 

> अधिवेशनात राहुल यांनी मोदी आणि त्यांच्या धोरणावर केले हल्ले

वैयक्तिक धोरण: मोदी उद्योगपती, भ्रष्टाचाऱ्यांचे घनिष्ठ मित्र

काँग्रेसने ८४ व्या महाधिवेशनात मोदींवर वैयक्तिक हल्ल्याचे धोरण कायम ठेवले. याआधी सोनिया गांधींनी मोदींना ‘मौत का सौदागर’ आणि मणिशंकर अय्यर यांनी ‘चहावाला’ तसेच ‘नीच आदमी’ म्हटले होते. त्यांना नरेंद्र मोदी यांनी कठोर प्रत्युत्तर दिले होते, शिवाय जनतेची सहानुभूतीही मिळवली होती. शनिवारी महाधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनियांनी मोदींना ‘ड्रामेबाज’ म्हटले होते. रविवारी राहुल यांनी मोदी शब्दाचा अर्थच क्रोनी कॅपिटलिझम (उद्योगपतींचे घनिष्ठ मित्र) असे संबोधले. त्यांनी ललित मोदी आणि नीरव मोदींशी जोडून मोदींवर वैयक्तिक हल्लाही केला. राहुल यांनी अमित शहांचा मुलगा आणि अरुण जेटलींच्या मुलीचे नावही भ्रष्टाचाराशी जोडले.

 

परराष्ट्र धोरण: शेजारी देशांत जे स्थान भारताचे हवे होते, त्यावर चीनचा कब्जा
राहुल यांनी मेक इन इंडियाच्या बहाण्याने भारतात मेड इन चायनाच्या धोरणावर हल्ला केला. मोदींचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याची टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, मालदीवमध्ये जे स्थान भारताला हवे होते त्यावर चीनने कब्जा केला आहे. काँग्रेसने प्रस्तावातही म्हटले आहे की, सरकारने अशी स्थिती निर्माण केली की, शेजारी देश चीनला घुसखोरीची संधी मिळाली.

 

कार्टून धोरण: पत्रकात ‘सूट-बूट, लूट की छूट’ शीर्षक, कॅप्शनमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’
अधिवेशनात अनेक पत्रके वाटण्यात आली. त्यात मोदींवर थेट हल्ला होता. एका पत्रकाचे शीर्षक आहे ‘सूट-बूट, लूट की छूट.’ पहिल्या पानावर एका कार्टूनमध्ये विजय मल्ल्या विमानातून पळून जाताना दिसतो, कॅप्शनमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ लिहिले आहे. घोटाळा शब्दाखाली ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदींची छायाचित्रे आहेत. राफेल करारासंदर्भातही नरेंद्र मोदींचे कार्टून बनवले आहे.

 

राहुल : कार्यकर्त्यांनाच तिकीट मिळेल 
राहुल महाधिवेशनात म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता नवी संस्कृती असेल. पक्ष पॅराशूट नेत्यांना नव्हे तर कार्यकर्त्यांना तिकीट देईल. अमेरिका, इंग्लंडच्या धर्तीवर पक्षात निवडणूक व्हावी, असे मत राहुल यांनी याआधीही मांडले होते. २००६ मध्ये सरचिटणीस झाल्यानंतर सर्वात आधी त्यांनी एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये नियुक्तीची प्रक्रिया संपवून निवडणूक सुरू केली होती. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत पथदर्शी प्रकल्प म्हणून १५ जागांवर प्रायमरी योजना लागू केली. त्याअंतर्गत तिकीट दावेदारांत निवडणूक घेऊन उमेदवारांची निवड केली होती.  

 

नवज्योत सिद्धू :  डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागतो
महाधिवेशनात पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, पुढील वर्षी राहुल गांधी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतील. भाजप बांबूप्रमाणे लांब आहे, पण आतून पोकळ आहे. त्यांनी ‘है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए, जो चेहरे निकलते हैं नकाबों के साथ, उनका जनाजा निकलना चाहिए,’ हा शेर सादर केला. सिद्धूंनी माजी पंतप्रधानांवर केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांची माफी मागितली. ते म्हणाले, सरदार मनमोहन सिंग यांची माफी मागतो. मौन राहून तुम्ही जे करून दाखवले ते भाजपच्या आरडाओरडीत झाले नाही. मला हे १० वर्षांनी समजले.  

बातम्या आणखी आहेत...