आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूत तयार होणार प्रशिक्षित पुराेहित अन् धार्मिक पर्यटनातील तज्ज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रशिक्षण घेणारे पुराेहित आता लवकरच देशभरात पूजा-अर्चा करताना िदसतील. इतकेच नव्हे, तर विद्यापीठात धार्मिक पर्यटन आणि वास्तुशास्त्राचे तज्ज्ञही तयार होणार आहेत. जेएनयूमध्ये नुकताच स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज (एसएसआयएस) अभ्यासक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमात प्रत्येक जाती, धर्म आणि समुदायाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृतला रोजगार उपलब्ध करणारी भाषा म्हणून दर्जा देण्याची विद्यापीठाची योजना आहे.  


एसएसआयएसचे डीन गिरीश नाथ म्हणाले की, संस्कृत ही प्राचीन भाषा असून अल्ट्रा-माॅडर्नही आहे. संगणकासाठी ही भाषा उपयुक्त अशी आहे. जेएनयूमध्ये हा अभ्यासक्रम २०१९ च्या नवीन सत्रापासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना श्रुतींवर आधारित स्त्रोतसूत्र, स्मृती किंवा परंपरेवर आधारित स्मृतसूत्रासारखे धडे दिले जातील. २३ फेब्रुवारीला एसएसआयएसच्या स्कूल को-ऑर्डिनेशन कमिटीने हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू अभ्यासक्रमांसह इतरही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. मसुदा तयार झाल्यावर तो बोर्ड ऑफ स्टडीजला पाठवण्यात येईल. त्यानंतर त्याला अॅकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत सादर केले जाईल. कौन्सिलची मंजुरी मिळाल्यावर २०१९ मध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले जातील. जेएनयूत २००१ मध्ये स्थापन झालेल्या स्पेशल सेंटर फॉर संस्कृत स्टडीजला आधुनिक करून डिसेंबर २०१७ मध्ये त्याचे रूपांतर स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीजमध्ये करण्यात आले.

 

नवीन सत्रात या अभ्यासक्रमात मिळेल प्रवेश

- देशभरातील धार्मिक स्थळांची संख्या पाहता धार्मिक पर्यटनात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल.  
- वास्तुशास्त्रात १ वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात नोकरी मिळेल.  
- योगामधील वाढती रुची पाहता या विषयात एमए पदवी अभ्यासक्रम. आयुर्वेदामध्ये बीएस्सीचा पदवी अभ्यासक्रम. पुढील टप्प्यात संस्कृत पत्रकारिता, शास्त्रीय संगीतासारखे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील. याशिवाय बीए (संस्कृत) ऑनलाइन-ऑफलाइन आणि कल्प वेदांगचा अभ्यासक्रमही यात समाविष्ट केला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...