आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकने भारतात निवडणुकीत दखल दिली तर कठोर कारवाई, झुकेरबर्गला भाजपचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुमारे पाच कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरून अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकी राजकारणात उठलेले वादळ आता भारतात पोहोचले आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी काँग्रेस डेटाचोरीचा आरोप असलेली संशोधन संस्था 'केम्ब्रिज अॅनालिटिका'ची सेवा घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला. तर, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकला इशारा देत भारतातील निवडणुकांत दखल दिली तर गंभीर परिणाम होतील, असे सुनावले.

 

सध्या सुमारे २० कोटी भारतीय फेसबुकचा वापर करतात. डेटाबाबत कोणताही घोटाळा सहन केला जाणार नाही. वेळप्रसंगी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना भारतात पाचारण केले जाईल, असे प्रसाद म्हणाले. दरम्यान, भाजपचे हे आरोप काँग्रेसने फेटाळले आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप बनावट न्यूज फॅक्ट्री चालवत असल्याचा आरोप केला.


भाजपने २०१० मधील बिहार विधानसभा निवडणुकीसह चार राज्यांतील निवडणुकांसाठी या संस्थेची सेवा घेतली असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकी आणि ब्रिटिश माध्यमांनी असा दावा केला आहे की, केम्ब्रिज अॅनालिटिकाने ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा गैरमार्गाने मिळवला होता. २०१६ मधील निवडणुकीत डोनॉल्ड ट्रम्प यांच्यासाठी आणि ब्रिटनच्या ब्रेक्झिट प्रकरणात समर्थनार्थ अभियान चालवून नागरिकांची मते फिरवली होती.

 

फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक
आता फेसबुक डिलिट करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे व्हाॅट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांना सुमारे २१०० लोक फाॅलो करतात. त्यांनी असे का म्हटले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फेसबुकने २०१४ मध्ये जेन कॉम व ब्रायन अॅक्टन यांच्याकडून व्हॉट्सअॅप कंपनी विकत घेतली होती.

 

काँग्रेसने अॅनालिटिकाकडून डाटाचा सौदा केला आहे का?
काँग्रेसचे केम्ब्रिज अॅनालिटिकावर इतके प्रेम का आहे? काँग्रेस २०१९ मध्ये मोदींविरुद्ध ब्रह्मास्र म्हणून याचा वापर करू इच्छिते. त्यांनी डाटाचा सौदा केला आहे का? डाटाचोरी करून काँग्रेस निवडणुका जिंकेल का? राहुल यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये त्याची काय भूमिका आहे? ट्विटरवर राहुल यांचे फॉलोअर वाढवण्यासाठी याचा वापर केला आहे का?
 - रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदेमंत्री

 

फेसबुकने केलेल्या फसवणुकीबाबत सारे काही
- ब्रिटनच्या चॅनल-४ने केम्ब्रिज अॅनालिटिकाच्या अधिकाऱ्यांचे स्टिंग केले. नेत्यांच्या विजयासाठी अॅनालिटिकाकडून गैरमार्गांचा वापर.
- ही संस्था जगभरात राजकीय पक्षांसाठी निवडणुकीत सोशल मीडियातून कॅम्पेन चालवते. ती ग्राहकास विजय मिळवून देण्यासाठी हनी ट्रॅप किंवा खोट्या बातम्या चालवते, असा दावा स्टिंगमध्ये होता.
- फेसबुक, ट्विटर आदींवर आपण जेवढा वेळ घालवतो, ज्या पोस्ट करतो, कॉमेंट शेअर किंवा लाइक करतो त्या डेटाचा वापर ही संस्था ग्राहकाच्या फायद्यासाठी करते.
- २०१६मध्ये अमेरिकी अध्यक्षपद, ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटच्या समर्थनार्थ हाच फंडा वापरून अभियान राबवले. केनिया आणि नायजेरियातही निवडणुकीत हाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भाजपच्‍या आरोपांवर काँग्रेसने काय उत्‍तर दिले...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...