आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- उत्तर प्रदेशात दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाला यामध्ये सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षाची टीका सुरू असताना आता आदित्यनाथांना हा घरचा आहेर मिळत आहे. स्वामी म्हणाले की, आपल्या राज्यात विजय मिळवू न शकणाऱ्या व्यक्तीकडे मोठे पद देणे म्हणजे लोकशाहीत आत्महत्या केल्यासारखेच आहे. जनतेत लोकप्रिय असलेल्या नेत्याकडे कोणतेही पद नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी.
गोरखपूर संसदीय मतदारसंघ आदित्यनाथांचा मतदारसंघ आहे. तेथे समाजवादी पार्टीचा विजय झाला. यापूर्वी योगी येथून ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय फुलपूर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ होता. तेथेही सपाला विजय मिळाला, तर बिहारमधील अरारिया येथे राष्ट्रीय जनता दलाला विजय मिळाला. पटना साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही ट्विट केले की, ‘उ.प्र., बिहारमध्ये सीटबेल्ट बांधण्याची वेळ आली आहे.’ शत्रुघ्न म्हणाले की, अति आत्मविश्वास पक्षाच्या अंगलट आला आहे.
योगी सरकारचा पहिला वर्धापन दिन साजरा होणार : पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतरही उत्तर प्रदेशात योगी सरकारचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. पराभवाने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे पुन्हा उत्साह येईल.
विकासावर प्रवचने देऊ नयेत : सिद्धरामय्या
विकासावर योगी आदित्यनाथांनी प्रवचने देऊ नयेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. सपा व बसपच्या युतीचे अभिनंदन सिद्धरामय्या यांनी केले. योगींनी कर्नाटकात येऊन विकासाच्या गप्पा करण्याऐवजी आपल्या राज्याकडे लक्ष पुरवावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. आदित्यनाथांनी ४ वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. या वेळी त्यांनी येथे काँग्रेसमुक्त कर्नाटकचा नारा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.