आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सत्तेसाठी कौरवांसारखा अन् काँग्रेस पांडवांसारखी सत्यासाठी लढते आहे : राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पक्षाच्या ८४ व्या महाधिवेशनाच्या समारोपात रविवारी काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक महाभारतासारखी असल्याचे सांगत भाजप सत्तेसाठी लढणारे कौरव आणि काँग्रेस सत्यासाठी लढणारे पांडव असल्याचे संबोधले. नीरव मोदी व ललित मोदींचा उल्लेख करून मोदी हे नाव भ्रष्टाचाराचे प्रतीक बनल्याचे ते म्हणाले. अमित शहांवर हल्ला करताना राहुल म्हणाले, हत्येतील आरोपीला भाजपने पक्षाध्यक्षपद दिले.२०१९च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला. राहुल म्हणाले, ‘मी निम्मे भाषण हिंदी आणि निम्मे भाषण या महाअधिवेशनात सहभागी दक्षिण भारतीयांसाठी इंग्रजीतून करेन.’ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही नोटाबंदी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्रावर टीका केली.

 

पंतप्रधान मोदींबाबत...
नीरव मोदी... याने सर्वात मोठी चाेरी केली. ललित मोदीने फिक्सिंग केली. मोदी हे नाव क्रॉनी कॅपिटॅलिझम व पंतप्रधान यांच्यातील हातमिळवणीचे प्रतीक आहे. 

 

भाजप अध्यक्ष शहांबाबत...
भाजप अध्यक्षपदावर लोक हत्येतील आरोपीला स्वीकारतात. मात्र, काँग्रेसबाबत ते स्वीकारणार नाहीत. कारण त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल सन्मान आहे. 

 

...आणि संघासाठी
काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इंंग्रजांच्या काळात काँग्रेस नेते तुरुंगात गेले. परंतु यांचे सावरकर पत्र लिहून दयेची याचना करत होते. 

 

सी-प्लेनमध्ये दिसले, पाणबुडीतही दिसतील 

- गुजरातमध्ये आम्ही कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला. तर मोदी सी-प्लेनमध्ये प्रवास करताना दिसले. आता ते पाणबुडीत दिसतील.
- मोदींना रोजगार, शेतकऱ्यांच्या मृत्यूवर प्रश्न विचारले तर ते म्हणतात, चला इंडिया गेटच्या समोर योगासने करूया.
- मोदींनी गाडी सुरू केली. एकीकडे नीरव तर दुसरीकडे ललित मोदी बसला. एका बाजूला राफेल व दुसऱ्या बाजूला अमित शहांचा मुलगा दिसला. गाडी निघाली पण तरुण पाहात राहिला. 
- मोदी आता सूट घालत नाहीत. त्यांना वाटते गुजरात तर हातून गेले. २०१९ मध्ये कदाचित आणखी मोठा फटका बसू नये.
- न्याय मागण्यासाठी जनता कोर्टात जाते. पण आरएसएसमुळे सुप्रीम कोर्टातील चार जज न्याय मागण्यासाठी जनतेच्या दरबारात आले.


टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस आज केंद्राविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार
सोमवारीही लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहे. या प्रस्तावाला पास करण्यासाठी ५० खासदारांचे समर्थन हवे. अशा स्थितीत दोन्ही पक्ष समर्थन मिळवण्यासाठी जुळवाजुळव करत आहेत. सध्या लोकसभ्ज्ञेत ५३८ सदस्य आहेत. एनडीएला बहुमत सिद्ध करण्यासाठी २७० सदस्यांची गरज आहे. भाजपकडे २७३ खासदार आहेत.

 

हा गांधींचा, वाघांचा पक्ष; घाबरू नका..!

देशात आज सगळेच भयभित आहेत. सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती आहे. माध्यम देखील भयभीत आहेत. ते काँग्रेस विरोधात वाइट देखील लिहितात. आम्हाला मात्र, त्याचे वाइट वाटत नाही. लिहा, आमच्या विरोधात काहीही लिहा, तरीही तुम्हाला कुणी घाबरवत असेल तर काँग्रेसचा पंजा लक्षात ठेवा. हाच हात तुमचे संरक्षण करेल. भाजपला भिऊ नका. त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. विसरू नका, की हा (काँग्रेस) गांधीजींचा पक्ष आहे. हा वाघांचा पक्ष आहे. आम्ही हिंसा करू शकत नाही. पण, भाजप तुम्हाला मारत असेल तर काँग्रेसचा हात तुमचे संरक्षण करेल. काँग्रेसच देशाला योग्य दिशा देऊ शकते असे राहुल यांनी ठणकावले आहे. 

 

'आम्ही किमान भाजपसारखे खोटे नाही बोललो'
राहुल म्हणाले, ''आम्ही भाजपसारखे खोटे बोललेलो नाही. काँग्रेसने कधीही द्वेष आणि तिरस्काराचे राजकारण केले नाही. भाजप केवळ एक संघटना आहे आणि काँग्रेस या देशाचा आवाज आहे. गांधीजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. आमचे 60 हजार कार्यकर्ते पंजाबात मारले गेले. यांच्याकडे (भाजप) मात्र एकही नाव नाही, की ज्यांनी देशासाठी आपला जीव दिला.''

 

70 वर्षांत असे पहिल्यांदा घडले

हिंदुस्तानाची जनता न्याय घेण्यासाठी कोर्टात जाते. पण, 70 वर्षांत पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे 4 जज न्यायासाठी जनतेकडे येतात. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. काँग्रेसला हिन्दुस्तानात इंस्टिट्युशन हव्या आहेत. पण, भाजपला इंस्टिट्युशन्स नको. त्यांना भारतातील सर्व संस्था संघटना नष्ट करून त्या सगळ्या स्वतःच्या अधिपत्याखाली आणायच्या आहेत. त्यांना फक्त एकच संघटना हवी ती म्हणजे, आरएसएस...

 

भाजपचा पलटवार
श्रीरामावर प्रश्न उपस्थित करणारे स्वत: पांडव कसे? राहुल यांच्या भाषणाला पराभूत व्यक्तीची टीका म्हणून पाहावे लागेल.दहशतवाद्यांच्या मृतदेहावर रडणारा हा पक्ष आहे. श्रीरामांवर प्रश्न उपस्थित करणारे स्वत:ला पांडव म्हणत आहेत. -निर्मला सीतारमण, संरक्षणमंत्री

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सिद्धूंनी 10 वर्षांनी मागितली माफी... 

बातम्या आणखी आहेत...