आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: दिल्लीचे आर्च बिशप म्हणाले धर्मनिरपेक्षता संकटात, 2019 साठी प्रार्थना करा; भाजपने नोंदवला आक्षेप Delhi Arcbishop Write Letter For Special Prayer Before Loksabha Election

नवीन सरकारसाठी प्रार्थना करा, आर्चबिशपच्या पत्रावरून वादंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

नवी दिल्ली - सध्या देशात राजकीय अशांती पसरली आहे. लोकशाही मूल्य आणि धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाल्याचे दिल्लीतील आर्च बिशप अनिल काऊटो यांनी सर्व चर्चमधील ख्रिश्चन धर्मगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले. केंद्र सरकारने आर्च बिशप यांनी लावलेले आरोप फेटाळले. आर्च बिशप यांचे वक्तव्य पूर्वग्रह दूषित असल्याचा पलटवार सरकारकडून करण्यात आला. 


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘मी अद्याप पत्र वाचलेले नाही, परंतु देशात जाती-धर्माच्या नावावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, तर ख्रिश्चन धर्मगुरूंनी राजकीय प्रकरणांपासून दूर राहायला हवे, असे केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स यांनी सांगितले. भाजप आणि संघानेही या पत्रावर टीका केली. वाद वाढल्यानंतर आर्च बिशप यांनी खुलासा करत पत्रातील मजकूर सरकारला उद्देशून नसल्याचे म्हटले. 

 

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काैटा यांच्या पत्रावरून निर्माण झालेला वाद वाढत चालला आहे. आर्चबिशप यांनी सर्व चर्चच्या पाद्रींना पत्र लिहून देशातील धर्मनिरपेक्षता संकटात असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर देशातील राजकीय परिस्थिती अशांत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले होते. त्यांनी हे पत्र ८ मे रोजी अर्थात दोन आठवड्यांपूर्वी लिहिले होते. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये, यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी पत्रातून केले. त्यालाच संघ तसेच भाजपने आक्षेप घेतला आहे.  गृहमंत्री राजनाथ म्हणाले, मी पत्र वाचलेले नाही. परंतु देशात अल्पसंख्याक सुरक्षित आहेत. भेदभाव केला जात नसणारा एकमेव देश आहे. त्यांच्याशिवाय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, गिरिराज सिंह, विनय कटियार यांच्यासह ९ भाजप नेते व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे पत्र म्हणजे धर्मांध समुदायाला भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. 

 

आर्चबिशप म्हणाले, उपवास करा , प्रसारासाठी सर्व चर्चला पाठवले पत्र

आपण अशांत राजकीय परिस्थितीचे साक्षीदार आहोत. सध्याच्या परिस्थितीत देशातील राजकीय वातावरण लोकशाही मूल्ये व देशाच्या धर्मनिरपेक्षतेसाठी धोकादायक आहे. राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणे ही आपली पवित्र परंपरा राहिलेली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे त्यास जास्त महत्त्व आले आहे. २०१९ मध्ये नवीन सरकार स्थापन होईल. १३ मेपासून आपल्या देशासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला लक्षात घेऊन प्रार्थना करा. त्याचबरोबर शुक्रवारी एक दिवसासाठी उपवास करा. त्यामुळे देशात शांतता, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव टिकून राहील. १३ मे रोजी मदर मरियमने दर्शन दिले होते. त्यामुळे हा महिना ख्रिश्चन धर्मीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आर्चबिशपने हे पत्र चर्चमध्ये आयोजित प्रार्थना सभेत वाचून दाखवण्याचेदेखील आवाहन केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

प्रतिक्रिया : लोकशाही व धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला   

 पंतप्रधान देशातून जात-धर्माचा अडथळा दूर करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहेत. त्यांचा विश्वास ‘सबका साथ, सबका विकास’ यावर आहे. बिशपने सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत.  
- मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री.  


लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवरील हा हल्ला आहे. हा तर व्हॅटिकनचा भारतातील निवडणूक प्रक्रियेतील थेट हस्तक्षेप आहे. आर्चबिशप यांच्या निष्ठा थेट पोप यांच्यासंबंधी असतात. भारतातील सरकारबद्दल नसतात.  - राकेश सिन्हा, संघ, विचारक.  
देशासाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करत आलो आहोत. हा आमचा खासगी विषय आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. आम्हाला देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता वाटते. लोकांनी देशासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पत्रातून केले होते, परंतु काही लोक त्याला जाणूनबुजून राजकीय रंग देत आहेत.  
-अनिल कौटा, आर्चबिशप.

 

> राजकारण तापण्याची तीन कारणे  

1 चाळीसहून जास्त लोकसभा जागांवर ख्रिश्चनांचा प्रभाव  

 दिल्लीचे आर्चबिशप यांच्या पत्रावरून राजकारण तापण्याच्या मुख्य कारणांपैकी एक ख्रिश्चन लोकसंख्येचा प्रभाव हे आहे. कारण ४० हून जास्त लोकसभा मतदारसंघांवर या समुदायाचा प्रभाव आहे. देशात ख्रिश्चनांची लोकसंख्या २.४ टक्के आहे. केंद्रात या समुदायाचे अल्फोन्स कन्नाथनम हे एकमेव मंत्री आहेत.   


2  ४ राज्ये ख्रिश्चनबहुल, ६ राज्यांत दुसऱ्या स्थानी  
ईशान्येतील चार राज्ये मणिपूर (४१ टक्के), मेघालय (७०.३ टक्के), मिझोराम ( ८७ टक्के), नागालँड ( ९० टक्के) ख्रिश्चनबहुल आहेत. त्याशिवाय सहा राज्यांपैकी आसाम, गोवा, आेडिशा, तामिळनाडू, छत्तीसगडमध्ये ख्रिश्चन समुदायाची लाेकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

3 गुजरात, मेघालय िनवडणुकीतही आवाहन 
दिल्लीचे आर्चबिशप यांच्याप्रमाणेच गुजरात निवडणुकीच्या वेळी गांधीनगरचे आर्चबिशप थॉमस मॅकवान यांनीही अशा प्रकारचे पत्र लिहिले होते. त्यात मॅकवान यांनी गुजरात सरकारला पराभूत करण्याचे आवाहन केले होते. त्या पत्रावरून गुजरातमध्ये गदारोळ झाला होता. त्याशिवाय मेघालय, नागालँडच्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही ख्रिश्चन समुदायाला आवाहन करण्यात आले होते.  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...