आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी आल्यामुळे रिफंडपासून रिटर्नपर्यंत सर्व ऑनलाइन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ४५ व्या ‘मन की बात’ द्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योग, खेळ, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि ५५० वे प्रकाश पर्व याबाबत चर्चा केली. 

 
जीएसटी ही देशासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा आहे, असा उल्लेख मोदींनी पुन्हा एकदा केला. जीएसटीमुळे मध्यस्थांची भूमिका संपली आहे, असा सांगत मोदी म्हणाले की, ‘एक देश, एक कर प्रणाली’ हे देशातील लोकांचे स्वप्न होते, ते आता प्रत्यक्षात आले आहे. जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे. आता रिफंडपासून रिटर्नपर्यंत सर्वकाही ऑनलाइन होत आहे. जीएसटी परिषदेच्या आतापर्यंत २७ बैठका झाल्या आहेत. परिषदेत विविध विचारसरणीचे लोक एकत्रितपणे देश आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेतात. मोदींनी अफगाणिस्तान-भारत यांच्यातील कसोटी सामन्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारताने करंडक घेताना अफगाणिस्तानला बोलावून सोबत फोटो काढला. खिलाडू वृत्ती काय असते हे त्यातून शिकू शकतो.


सकारात्मक- अभियंत्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बनवला ट्रस्ट
मोदी म्हणाले की, बंगळुरूत कॉर्पोरेट, आयटी इंजिनिअर्सनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एक समृद्धी ट्रस्ट बनवला आहे. हे लोक शेतकऱ्यांशी जोडले गेले, योजना आखल्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत राहिले. दुर्गम भागात मुली कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या पेन्शनपासून पासपोर्ट बनवण्यापर्यंतच्या सेवा देत आहेत. छत्तीसगडची एक भगिनी सीताफळ जमवून त्याचे आइस्क्रीम करण्याचा व्यवसाय करत आहे. झारखंडमधील अंजन प्रकाश यांच्याप्रमाणे देशातील लाखो युवक औषध केंद्र चालवण्याबरोबरच आसपासच्या गावांत स्वस्त औषधे देतात.


डॉ. मुखर्जींनी देशाची एकता, अखंडतेसाठी दिले बलिदान
मोदींनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण करताना म्हटले की, २३ जूनला देशाचे सुपुत्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींची पुण्यतिथी होती. त्यांचा विविध क्षेत्रांशी संपर्क होता. वयाच्या ३३ व्या वर्षीच ते विद्यापीठाचे कुलगुरू झाले. भारताच्या औद्योगिक प्रगतीची पायाभरणी करण्यासाठीही मुखर्जी सदैव स्मरणात राहतील. ते भारताच्या अखंडत्वाचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बंगालचा एक भाग आज भारताचा अखंड भाग झाला आहे. ५२ व्या वर्षी त्यांनी देशाची एकता, अखंडत्वासाठी आपले बलिदान दिले.


योग: संपूर्ण जगाची दिसली एकजूट, उत्सव बनवला
मोदी म्हणाले की, योग करण्यात संपूर्ण जग एकजूट दिसले. सौदी अरेबियात महिलांनी अनेक आसने सादर केली. लोकांनी त्याला मोठा उत्सव बनवले. अहमदाबादमध्ये ७५० दिव्यांग बंधू-भगिनींनी योग करून विश्वविक्रम केला. आपल्या लष्करातील जवानांनी हिमालयाच्या शिखरावर, नदीत योगासने केली.


डॉक्टर: पुनर्जन्म देतात, ते कुटुंबाचाच भाग
१ जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो. पंतप्रधानांनी त्याबद्दल डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आपली संस्कृतीच आईला देवी मानण्याची आहे. आई आपल्याला जन्म देते तर अनेकदा डॉक्टर पुनर्जन्म देतात. ते देवाचे दुसरे रूप असतात. डॉक्टरची भूमिका फक्त उपचारापुरतीच नसते, ते कुटुंबाचाच भाग असतात.


५५० वे प्रकाश पर्व : ते कसे साजरे करायचे याची तयारी करा
२०१९ मध्ये गुरुनानक देव यांचे ५५० वे प्रकाशपर्व साजरे केले जाईल. ते कसे साजरे करावे याबाबत विचार करावा आणि तशी तयारी करावी, गौरवाबरोबरच या प्रकाश पर्वाला प्रेरणा पर्व बनवावे.

बातम्या आणखी आहेत...