आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा राज्यांत वादळ, सातमध्ये पाऊस; 31 ठार ; हवामानाचे वेगवेगळ्या रूपात मोठे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील १३ राज्यांमध्ये हवामानाने वेगवेगळ्या रूपात मोठे नुकसान केले आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांत अद्याप मान्सून पोहोचला नाही. मात्र, वादळामुळे येथे नुकसान झाले आहे. गुरुवारी पंजाब, चंदिगड, दिल्ली व राजस्थानात वादळामुळे अनेक भागात धुळीची चादर पसरली होती. यूपीत बुधवारी रात्री वादळामुळे २० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे ईशान्येतील चार राज्यांत पुरामुळे तीन लाखांहून अधिक लोकांना फटका बसला. कर्नाटक व केरळमध्येही पूरस्थिती आहे. मुंबईतही पावसामुळे नौदलाने बचाव व मदत कार्यासाठी अलर्ट जारी केला आहे.  

 

दिल्ली । १७ पर्यंत बांधकामावर बंंदी 

राजस्थानातील धुळीचा परिणाम गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये दिसला. दृश्यमानता नव्हती. दिल्लीतील अनेक भागांत पीएम-१० चा स्तर ५०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत राहिला. आनंद विहारमध्ये पीएम १० चा स्तर सर्वात जास्त ९२९ राहिला. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये येत्या तीन दिवसांपर्यंत हवामान असेच राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्लीत वाईट हवामानामुळे नायब राज्यपालांनी रस्त्यांवर शिडकावा व १७ जूनपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. 

 

यूपी । ७५ किमी वेगाने वारे वाहणार  

उत्तर प्रदेशातील अनेक भागांत बुधवारी रात्री वेगवान वादळामुळे १५ जणांचा मृत्यू, तर २८ जखमी झाले. सर्वात जास्त बळी सीतापूरमध्ये गेले. अनेक ठिकाणी वादळात झाडे उन्मळून पडली. काही भागांत घरांची पडझड झाल्याने दुर्घटना घडल्या. हवामान विभागानुसार, जवळपास ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहिले. हवामान विभागाने पूर्व व मध्य यूपीतील जिल्ह्यांत लोकांना येत्या काही दिवसांत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. येथे एक-दोन दिवस वेगवान वारे व पावसाचा इशारा दिला आहे.  

 

ईशान्य भारत । त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये पूरस्थिती, तीन लाख लोकांवर परिणाम  

ईशान्य भारतात ४८ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरा, मिझोराम, आसाममध्येही पूरसदृश स्थिती झाली आहे. त्रिपुरात चार, तर मणिपूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. भूस्खलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.  


त्रिपुरा : सीएम बिप्लव देव यांनी अनेक भागांची हवाई पाहणी केली. त्यांनी केंद्राला लष्कर व एनडीआरएफ पाठवण्याची विनंती केली आहे. ५०० कुटुंबांना छावणीत पाठवले आहे.  


आसाम : राज्यात लमडिंग-बादरपूर हिल भागात मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे ४ रेल्वे रद्द करण्यात आल्या. ६ जिल्ह्यांत २२२ गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.  


मणिपूर : इंफाळ, बिष्णुपूर पुरात बुडाले आहेत. ३५०० कुटुुंबांना ८९ छावण्यांमध्ये पाठवले आहे.  

 

आतापर्यंत देशात सामान्यापेक्षा १९ टक्के जास्त पाऊस  
गेल्या २४ तासांत मान्सून ओडिशा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयातील बहुतांश भागात व्यापला आहे. गुरुवारी सर्वात जास्त ८२९ मिमी पाऊस वेंगुर्ल्यात (कोकण) झाला. येत्या २४ तासांत मान्सून ईशान्य भारत, सिक्कीम, पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिण किनारपट्टीच्या भागात अधिक सक्रिय राहील. नैऋत्य मान्सून देशात २८ मे रोजी दाखल झाला होता. या १७ दिवसांत सर्वाधिक पाऊस कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ, नागालँड मणिपूर, मिझोराम, आसाम व त्रिपुरामध्ये झाला. याशिवाय तेलंगणा, महाराष्ट्रातील अनेक भाग, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र किनारपट्टी व पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस झाला आहे. देशात आतापर्यंत १९% जास्त पाऊस झाला.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...