आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसरा, अाैरंगाबाद मात्र फेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारतर्फे घेण्यात अालेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात अाला. त्यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या झारखंड राज्याने प्रथम तर महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला. छत्तीसगड राज्य तिसऱ्या स्थानावर अाहे. महाराष्ट्रातील नऊ शहरांना स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या गटांत विविध पुरस्कारही जाहीर झाले अाहेत.

 

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त नऊपैकी सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर हाेणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी झालेल्या संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांसह त्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले.

 

विभागस्तरीय ३ पुरस्कार
देशातील विभागनिहाय पुरस्कारांत महाराष्ट्राला ३ पुरस्कार जाहीर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट 'स्वच्छ शहरा'चा मान मिळाला. 'नागरिक प्रतिसादा'च्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट शहराला मिळाला. तर पुणे जिल्ह्यातील सासवडला 'नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली'चा पुरस्कार जाहीर झाला.

 

इंदूर दुसऱ्यांदा ठरले सर्वात स्वच्छ शहर
मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला अाहे. त्यापाठाेपाठ भाेपाळ व चंदिगड यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. या सर्वेक्षणात ४२०० शहरांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात अाली.

 

अाैरंगाबादला 'कचरा' भाेवला
अाैरंगाबाद शहरानेही या स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. केंद्रीय पथकाकडून शहराच्या स्वच्छतेचीही पाहणी करण्यात अाली हाेती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा माेठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बदनाम झालेले हे शहर पुरस्काराच्या कसाेटीत उतरू शकले नाही.


पुरस्कारप्राप्त सहा शहरे
भिवंडी : गतिमान मध्यम शहर.
मुंबई : सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर.
नवी मुंबई : शहर 'घन कचरा व्यवस्थापना'त देशात सर्वोत्तम.
भुसावळ : 'गतिमान' लहान शहर.
नागपूर : देशात 'नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली' असणारे शहर.
परभणी : नागरिकांच्या प्रतिसादासाठी उत्कृष्ट.

 

बातम्या आणखी आहेत...