आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तींना 24 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी; आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात पतियाळा हाऊस न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.  


तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कार्तीला सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुनील राणा यांच्या न्यायालयात हजर केले. कोठडीत असताना कार्तींनी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, त्यांनी चौकशीत सहकार्य केले नाही, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. चौकशीदरम्यान सहकार्य न केल्याने  कार्ती यांच्या सहकार्याविनाच चौकशी करावी लागली. या प्रकरणात कार्ती यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही कार्तींच्या न्यायालयीन कोठडीसाठी आग्रह करत आहोत, असेही सीबीआयने सांगितले.  


दिल्ली उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) समन्स आदेशाच्या विरोधातील याचिकेवर १० मार्चला सुनावणी करताना कार्ती यांना २० मार्चपर्यंत अटक करू नये, असा आदेश  दिला होता. ईडीने गेल्या वर्षी मे महिन्यात कार्तीच्या विरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पी. चिदंबरम हे केंद्रात अर्थमंत्री असताना कार्ती यांनी आयएनएक्स मीडिया लिमिटेड आणि पीटर व इंद्राणी मुखर्जी यांना कथितरीत्या फायदा करून देण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची (एफआयपीबी) मंजुरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्या बदल्यात लाच घेतली होती, असा आरोप कार्ती यांच्यावर आहे.  

बातम्या आणखी आहेत...