आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) महाघोटाळ्यातील मुख्य दोन आरोपींपैकी मेहुल चौकसी याने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नोटीसला उत्तर दिले आहे. मेहुल चौकसीने मंगळवारी सीबीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, 'मी सध्या परदेशात माझा व्यवसायाचा जम बसवण्याचे काम करत आहे. भारतात माझ्याविरोधात जे आरोप झाले त्यात सेटलमेंट करण्याची माझी इच्छा आहे. मात्र चुकीच्या आरोपातून भारतातील माझा बिझनेस बंद करण्यात आला आहे.'
काय आहे मेहुल चौकसीवर आरोप?
- मेहुल चौकसी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबी बँकेत 12,672 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
- मेहुल आणि नीरव हे मामा-भाचे पीएनबी बँकेला चुना लावून विदेशात पळून गेले आहेत.
- मेहुल चौकसीने याआधी 9 मार्चला सीबीआयला 7 पानांचे पत्र लिहिले होते. त्यात त्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि पासपोर्ट रद्द केल्यामुळे भारतात परतणे आता शक्य नसल्याचे म्हटले होते.
मेहुल सीबीआयला आणखी काय म्हणाला?
- मेहुल चौकसीने सीबीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करु शकत नाही आणि भारतात येऊ शकत नाही.
- 'मला हे देखील सांगायचे आहे की मी चौकशीला तयार आहे. मात्र मला कोणतीही मदत मिळत नाही ना माझ्याकडे काही माहिती आहे. अनेक तपास यंत्रणा माझ्याविरोधात चौकशी करत आहेत. हे योग्य नाही.'
- 'मी सध्या विदेशात आहे. याआधीच्या नोटीसला देखील उत्तर दिले आहे. मात्र प्रकरण अजून जैसे थे आहे. मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. मीडिया देखील आपल्या पद्धतीने ट्रायल करत आहे. प्रत्येक गोष्ट वाढवून सांगितली जात आहे.'
काय आहे पीएनबी घोटाळा ?
- पंजाब नॅशनल बँकेने फेब्रुवारीमध्ये सेबी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बँकेत 11,421 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती दिली होती. बँकेच्या मुंबईतील ब्रेडी हाऊस ब्रँचमध्ये हा घोटाळा झाला होता. 2011 ते 2018 दरम्यान 297 बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या (LoU) आधारे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीने विदेशी अकाऊंट्समधून कोट्यवधी रुपये काढले होते.
- या प्रकरणी सीबीआयने पहिली एफआयआर 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली होती.
- पीएनबी घोटाळ्यात नवी माहिती समोर आली आहे. बँकेने नुकतेच सीबीआयला सांगितले की 1300 कोटी रुपयांचा आणखी घोटाळा झाला होता. हा घोटाळा मेहुल चौकसीची कंपनी गीताजंली जेम्सशी संबंधीत आहे. अशा पद्धतीने 11,421 कोटींचा घोटाळा आता 12,672 कोटी रुपयांचा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.