आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या खासदारांनी दोन्ही सभागृहांत मंगळवारी गदारोळ केल्यामुळे सलग १२ व्या दिवशीही संसदेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणता आला नाही.
५ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून पंजाब नॅशनल बँक घोटाळा तसेच अन्य मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरूच आहे. परिणामी संसदेत काेणतेही कामकाज होऊ शकले नाही. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर संसदेत सरकार व विरोधकांतील दरी आणखी वाढली आहे. वायएसआर काँग्रेस व सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी नाते तोडताच देलगू देसमने सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली.
मात्र, गोंधळामुळे लोकसभेत तो सादर होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांप्रमाणे मंगळवारी सकाळी सभागृहाची कारवाई सुरू होताच विरोधी सदस्यांनी आपापले मुद्दे रेटत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीस दुपारी १२ वाजेपर्यंत व पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. एका तहकुबीनंतर १२ वाजता पुन्हा कामकाज सुरू होताच अण्णाद्रमुकचे सदस्य कावेरी पाणीप्रश्नाच्या मागणीवर हातात बॅनर घेऊन अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले.
तेलगू देसम पार्टी तसेच वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ जागेवरून उभे राहिले. अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इराकच्या मोसूलमधील अपहृत भारतीयांबाबत आवश्यक माहिती देऊ इच्छितात. मात्र, तरीही विरोधक गोंधळ घालू लागले. काँग्रेस व डाव्या पक्षांच्या सदस्यांसह सर्व विरोधी पक्षांचे खासदार उभे राहिले व घोषणाबाजी करून गोंधळ घालू लागले. विरोधी खासदार मंत्र्यांचे निवेदन ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. कामकाज सुरळीत होत नसल्याचे दिसताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यसभेत सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी कामकाज सुरू करताना मंत्र्यांना आवश्यक कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.