आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएससी पेपर फुटीप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश; आंदोलन थांबवण्याचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

नवी दिल्ली- सरकारने कर्मचारी निवड आयोगाच्या  (एसएससी) भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी परीक्षेतील उमेदवारांंनी तीव्र आंदोलने केली आहेत. ही सर्व आंदोलने बंद करण्याचे आवाहन सरकारने केले. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी सीबीआयला चाैकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी आता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.  


गेल्या रविवारी एसएससीने संयुक्त पदवी स्तरीय (दुसरा टप्पा) परीक्षा २०१७ मधील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याची शिफारस केली होती. सोशल मीडियामध्ये हे प्रकरण सार्वत्रिक प्रसारित झाले. आठवडाभरापासून परीक्षार्थी राजधानी दिल्लीत निदर्शने करत आहेत.  


राजनाथ सिंह यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी आता घरी परतावे. सीबीआय तपास अहवाल लवकरच जारी होईल. भारतीय जनता पार्टीचे (भाजप)  दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारींच्या नेतृत्वातील पक्ष खासदारांच्या  प्रतिनिधी मंडळाने सोमवारी सकाळी सिंह यांची भेट घेतली. सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रतिनिधी मंडळात उदित राज, प्रवेश वर्मा, निशिकांत दुबे होते. तिवारींनी सांगितले की, १७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या सर्वच परीक्षांचा तपास होणार आहे. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही.  

 

सीबीआयला लिखित आदेश दिल्यावरच आंदोलन थांबवू : परीक्षार्थी  

कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन समाप्त करण्याचे आवाहन केले. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी स्वीकारली असून लिखित सूचना दिल्या जातील, असे जितेंद्र सिंह म्हणाले. दरम्यान विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, ऑनलाइन होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थी व परीक्षकांना पेन अथवा मोबाइल बाळगण्याचा अधिकार नाही. तरीही परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचा स्क्रीन शॉट प्रसारित झाला. लिखित आदेश सीबीआयला देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

बातम्या आणखी आहेत...