आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात तीन दिवसांत चार राज्यांमध्ये चार महापुरुषांची झाली विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा पाडला. तामिळनाडुत पेरियार आणि पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसादांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. - Divya Marathi
लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा पाडला. तामिळनाडुत पेरियार आणि पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसादांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.

नवी दिल्ली- त्रिपुरामध्ये व्लादिमीर लेनिनच्या पुतळ्याला बुलडोझरने हटवण्यात आल्यानंतर देशातील महान तत्वचिंतक, नेत्यांच्या पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या. तीन दिवसांतच चार राज्यांत चार महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली. सर्वात अगोदर सोमवारी त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी लेनिनचा आणखी एक पुतळा तोडण्यात आला. मंगळवारीच तमिळनाडूमध्ये पेरियार, पश्चिम बंगालमध्ये शामा प्रसाद मुखर्जी व उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीभंजन, तोडफोडीच्या घटनांवर टीका केली आहे. त्यांनी यासंंबंधी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री राजनाथ म्हणाले, सर्व राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना अशा घटनांत सामील होऊ नये, असा इशारा द्यावा.

 

त्रिपुरा :  २ दिवसांत भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचे दोन पुतळे पाडले

त्रिपुराच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी बेलोनियामध्ये ११.५ फूट उंचीचा लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला होता. मंगळवारीही लेनिनच्या एका पुतळ्याची तोडफोड झाली. पहिल्यांदाच भाजपला राज्यात सत्ता मिळाली. बुधवारी माकप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात भाजपचे ५ कार्यकर्ते जखमी झाले.

 

तामिळनाडू :  नेत्याच्या पोस्टनंतर पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात मंगळवारी रात्री समाजसुधारक व द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई. व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. ही घटना भाजप नेते राजा यांच्या फेसबुक पोस्टनंतर घडली. पोलिसांनी भाजप व एका माकपशी संबंधिताला अटक केली. कोइम्बतूरमध्ये भाजप कार्यालयावर बाँबने हल्ला झाला.

 

उत्तर प्रदेश : मेरठमध्ये आंबेडकरांचा पुतळा तोडला, तत्काळ नवा बसवला
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यामधील मवाना भागात मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. परंतु प्रशासनाने त्या जागी तत्काळ नवीन पुतळा बसवला. या घटनेवरून स्थानिक लोकांत बराच वेळ तणाव होता. नागरिकांनी पुतळा बदलण्याची मागणी केली. 

 

पश्चिम बंगाल :  ७ लेफ्ट विंग संघटनेच्या सदस्यांनी फासले काळे
बुधवारी कोलकात्यातील कालीघाटमध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासले. पोलिसांनी मुखर्जी यांच्या पुतळ्याची नासधूस केल्याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. हे हल्लेखोर लेफ्ट विंग संघटनेशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यात ६ पुरुष, तर एक महिला आहे.

 

संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ  

संसदेच्या बजेट सत्राच्या पहिल्या तीन दिवसांत प्रचंड गोंधळ झाल्याने कामकाज स्थगित ठेवावे लागले. बुधवारी लोकसभा व राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष खासदारांनी पुतळा तोडणे, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, नीरव मोदीप्रकरणी प्रचंड गदारोळ घातला. 

 

लेनिनचा पुतळा पाडण्याचे राज्यपालांनी केले समर्थन
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी बुधवारी ट्विट करून एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला. इंडिया गेटहून जॉर्ज व्हीचा पुतळा हटवला गेला होता. व्हिक्टोरिया राणीच्या कोलकाता येथील मेमोरियलमधील पुतळा हटवला. आैरंगजेब रस्त्याचे नाव बदलले. अशा रीतीने लेनिनचा पुतळा हटवला तर त्यात वावगे काय? लेनिन सरणीचे नाव बदलले तर गैर काय? भाजप नेता राम माधव यांनी पुतळा पाडण्याचे समर्थन केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले की, लेनिनचा पुतळा रशियातून नव्हे, तर त्रिपुरातून पाडण्याची मागणी होत आहे. या ट्विटवर टीका झाली. त्यानंतर त्यांनी ते डिलिट केले.

 

पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली, गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आदेश 
- पुतळे पाडणे किंवा त्यांची तोडफोड व विटंबणाच्या वाढत्या घटनांचा पंतप्रधान मोदींनी निषेध केला आहे. त्यांनी गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अॅडव्हायजरी पाठवली आहे. अशा घटना करणाऱ्यांतवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. 

 

भाजप कडक कारवाई करणार 
- अमित शहांनीही या घटनांवर प्रतिक्रीया दिली आहे. शहांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'तामिळनाडू आणि त्रिपुराच्या युनिट्ससोबत माझे बोलणे झाले आहे. पुतळे तोडफोडीच्या घटनांमध्ये भाजपशी संबंधीत व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर पक्ष कडक कारवाई करेल.'
- तामिळनाडुमध्ये भाजपच्या दोन नेत्यांनी सोशल मीडियावर पेरियार रामासामी यांचे पुतळे केव्हा काढले जातात याची उत्सूकता असल्याच्या वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. 

 

काय म्हणाले भाजप नेते... 
- पेरीयार रामास्वामी यांच्या पुतळ्याचे विटंबन होण्यापूर्वी भाजप नेते एच. राजा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा पाडण्यात आला, उद्या तामिळनाडूत रामासामी पेरिया यांचा पुतळा हटवला जाईल. 
- त्रिपुरानंतर तामिळनाडुमध्ये पुतळ्यांचे राजकारण सुरु झाले आहे. भाजप नेत्याच्या फेसबुक पोस्ट नंतर भाजपच्या युवक आघाडीचे उपाध्यक्ष एस.जी.सूर्या यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. 
ते म्हणाले, 'भाजपने त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा यशस्वीपणे पाडला. आता तामिळनाडुमध्ये ईव्ही रामासामींचा पुतळा पडण्याची वाट पाहणे कठीण झाले आहे.'

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्लोर येथील तिरुपत्तूर येथे रात्री साधारण 9.15 वाजता नशेत असलेल्या दोघा जणांनी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांना तत्काळ अटक करण्यात आले आहे. त्यातील एक आरोपी मुथुरमन हा भाजपचा सदस्य आहे. तर त्याच्यासोबतचा फ्रान्सिस हा सीपीएमशी संबंधीत आहे.

 

24 तासांत लेनिनचे दोन पुतळे पाडले
त्रिपुराच्या बेलोनियामध्ये सोमवारी रशियन क्रांतीचे नायक व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर हिंसाचार पेटला आहे. समर्थक व विरोधकांत तीन दिवसांत 770 चकमकी झडल्या असून त्यात एक हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले. मंगळवारीही सबरूम गावात लेनिनचा आणखी एक पुतळा पाडण्यात आला. यावरून भाजप अाणि माकपकडून आरोप- प्रत्याराेप हाेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...