आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या पायबंदासाठी भारत- फ्रान्स परस्परांचे नौदल तळ वापरणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावर प्रोटोकाॅल तोडून मॅक्रोन यांचे स्वागत केले. उभय नेत्यांत हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. त्यात दहशतवाद, सुरक्षा, हिंदी महासागर व जनतेमधील संपर्क वाढवण्यावर सहमती झाली आहे. चीनच्या आक्रमकतेला पायबंद घालण्यासाठी भारत-फ्रान्स परस्परांच्या नौदल तळाचा वापर करण्यासाठी सहमत झाले आहेत. दोन्ही देशांत १४ करार झाले.  


हिंदी महासागर प्रदेशात चीनला रोखण्यासाठी भारत व फ्रान्स यांच्यात एक महत्त्वाचा सौदा झाला आहे. त्यानुसार दोन्ही देश आपल्या नौदल तळाचा परस्परांना वापर करू देणार आहेत. त्याबाबत सहमती झाली आहे. शनिवारी मोदी व मॅक्रोन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीची माहिती दिली. तत्पूर्वी मॅक्रोन यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली. तेथे त्यांना मानवंदना देण्यात आली. राजघाटावर जाऊन मॅक्रोन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली. या दरम्यान पत्नी ब्रिगित मॅरी क्लाउडदेखील सोबत होत्या. मॅक्रोन यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली.  दोन्ही नेत्यांमधील चर्चेतून विश्वास  आणखी वाढला. 

 

मित्रच नव्हे, प्राचीन सांस्कृतिक नाते : मोदी  
भारत-फ्रान्स यांच्यात सामरिक संबंध भलेही २० वर्षांपासून सुरू झाले आहेत. मात्र, दोन्ही देशांत मैत्रीचे अतूट नाते आहे. खरे तर मैत्रीच नव्हे, तर प्राचीन सांस्कृतिक नातेही आहे. पंचतंत्रातील गोष्टी, महाभारत, रामायणाच्या माध्यमातून फ्रेंच तत्त्वज्ञांनी भारताला जाणून घेतले आहे. रोम्या रोला, व्हिक्टर ह्युगोंसारख्या महान व्यक्तींनी भारताचा गहन अभ्यास केला आहे. फ्रान्स व भारत एका व्यासपीठावर येणे हा शांततामय जगाचा संदेश देणारा विषय ठरतो. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला सुरुवात झाली होती. तेव्हा फ्रान्सने महत्त्वाची भूमिका वठवली होती. संरक्षण, सुरक्षा, अंतराळ व तंत्रज्ञानात भारत व फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रदीर्घ वारसा दिसून येतो. सरकार कोणतेही असो संबंध नेहमीच वरच्या पातळीवर पोहोचलेले आहेत, असे मोदी यांनी याप्रसंगी सांगितले.  

 

भागीदारीचे नवे युग : मॅक्रोन  

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, फ्रान्स-भारत सर्वोत्कृष्ट भागीदार आहेत. संरक्षण, संशोधन तसेच विज्ञान त्यातही तरुणांना उच्च शिक्षण-प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात उभय देश सहकार्य करतील. सामरिक क्षेत्रातील भागीदारीचे नवे युग सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे, असे मॅक्रोन यांनी सांगितले.  

 

१४ करार 

शिक्षण, रेल्वे, इंडो-फ्रान्स फोरम, पर्यावरण,अंतराळ, नौदल , आण्विक, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा, मादक पदार्थांच्या तस्करीस प्रतिबंध, स्थलांतर-संपर्क, गोपनीय माहितीची सुरक्षा, सागरविषयक माहितीची देवाणघेवाण.  

 

बातम्या आणखी आहेत...