आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींकडेच असावे; शीला दीक्षित यांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसमोर गंभीर आव्हान उभे करायचे असेल तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेच विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व यायला हवे, असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.  


वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दीक्षित म्हणाल्या की, ‘मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेसला विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करायचे आहे. राहुल गांधी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडेच विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्वपद यायला हवे.बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तिला आणखी वेग यायला हवा. त्यासाठी आपापसातील मतभेद दूर करण्याची गरज आहे.’ काँग्रेसने आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. 


सोनिया गांधी यांच्या पक्षातील भूमिकेबाबत विचारणा केली असता दीक्षित म्हणाल्या की, सोनिया गांधी दोन दशकांपासून काँग्रेसच्या नेत्या आहेत. इतर कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांना पक्षाची जास्त माहिती आहे. त्या जबाबदारीपासून पलायन करतील, असे वाटत नाही. काँग्रेस पक्ष संपला असे वाटत असताना त्यांनी पक्षाची उभारणी केली आहे. त्या मार्गदर्शक म्हणून कायम राहतील.  

 

संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी गेलेच का?  
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले होते. त्याबाबत विचारले असता दीक्षित म्हणाल्या की, मुखर्जी यांचे तेथील भाषण खूप चांगले झाले. त्याला सर्वांकडून दादही मिळाली. पण तरीही मुखर्जी तेथे गेलेच का, हे मात्र काँग्रेसमधील कोणालाही समजलेले नाही. काँग्रेस पक्ष त्यामुळे निराश झाला आहे. मुखर्जी यांच्यामुळे संघाला काही फायदा झाला असावा, असे निरीक्षणही दीक्षित यांनी नोंदवले.  

बातम्या आणखी आहेत...