आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीला लवकरच भारतात आणणार: Interpol कडून रेड कॉर्नर नोटीस, ED कडून प्रत्यर्पणाचा अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. सीबीआयने केलेली विनंती मान्य करून इंटरपोलने ही कारवाई केली आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा अर्थ इंटरपोल आपल्या सदस्य देशांना संबंधित व्यक्तीला अटक करण्याची विनंती करतो. 2 अब्ज अमेरिकन डॉलरचा घोटाळा करून फरार असलेल्या नीरव मोदीला आता इंटरपोल सदस्य असलेल्या कुठल्याही देशाकडून अटक होण्याची शक्यता आहे.

 

ED कडून प्रत्यर्पणाचा विनंती अर्ज दाखल

पीएनबी फ्रॉड प्रकरणात एकीकडे इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढला असताना अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने सुद्धा प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी प्रत्यर्पणाचा विनंती अर्ज अधिकृतरित्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे दाखल केला आहे. हा अर्ज पुढे ब्रिटनला पाठवला जाणार आहे. 

 

यापूर्वी बजावली होती डिफ्युजन नोटीस

सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात यापूर्वीच नीरव मोदी विरोधात आरोपपत्र दाखल केला आहे. देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असलेल्या या प्रकरणात नीरव मोदीसह मेहुल चौकसी, मोदीचा भाऊ निशाल (बेल्जिअमचा नागरिक) आणि कंपनीचा कार्यकारी अधिकारी सुभाष परब यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयने यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी मोदी, चौकसी आणि निशाल यांच्या विरोधात डिफ्युजन नोटीस सुद्धा बजावली होती. या नोटीशीत संबंधित देशाला फरार आरोपींचे ठिकाण सांगण्याची विनंती केली जाते. यानंतर ब्रिटनने त्याच्या हालचालींची माहिती दिली होती. सोबतच, तो एका देशात किंवा एका ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही असेही समोर आले होते.

 

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा
सीबीआयने गेल्या महिन्यात आपल्या चार्जशीटमध्ये आरोप लावला होता की मोदीने बनावटरित्या पंजाब नॅशनल बँकेतच्या ब्रॅडी हाऊस मुंबई या शाखेतून 6,498.20 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. तर चौकसीने 7080.86 कोटी रुपयांचे लोन घेऊन परत करण्यास नकार दिला. एकूणच हा घोटाळा 13 हजार कोटी रुपयांचा आहे. एवढेच नव्हे, तर मेहुल चौकसीने काढलेल्या 5 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाची सुद्धा सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...