आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत शिवजयंती सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती, चित्तथरारक कसरतींनी वेधले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजन्मोत्सव सोहळा, ढोलपथक, शाहिरी आणि मर्दानी खेळांसह राजपथावरुन मिरवणूक असा दिल्लीतील शिवजयंती सोहळा आहे. भाजप खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशय खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवजयंती राष्ट्रीय सोहळा व्हावा ही यामागची भूमिका आहे. 

 

सकाळी महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा झाला. दिल्लीतील शिवजयंती कार्यक्रमात हत्ती, घोडेही पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून यासाठी लोक आले होते. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन फुलांनी सजवण्यात आले होते. प्रवेशद्वारात फुलांची रांगोळी टाकण्यात आली होती. 

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते, मात्र या सोहळ्याने दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेतले. दिल्लीतील मिरवणुकीसाठी महाराष्ट्रातून कलापथक, ढोल पथक बोलावण्यात आले आहेत. पुण्यातून 300 कलाकारांचे ढोलपथक, वारकरी दिंडी आणि मल्लखांब, कुस्ती असे मर्दानी खेळ करणारे जवळपास 100 कलाकार आले आहेत.  नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर चित्ररथ होता. 

सोमवारी सायंकाळी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवगर्जना हे महानाट्य होणार आहे. 

 

ट्विटरवर #ShivajiJayanti हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

बातम्या आणखी आहेत...