आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिझवर संपूर्ण ताकदीने खटला चालवा;अमेरिकेचा पाकवर दबाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाफिजला पाक पंतप्रधान खकान यांनी साहेब म्हटले होते. - Divya Marathi
हाफिजला पाक पंतप्रधान खकान यांनी साहेब म्हटले होते.

वॉशिंग्टन- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदच्या विरोधात कोणताही खटला नसल्याच्या पाकिस्तान पंतप्रधानांच्या वक्तव्याचा शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने समाचार घेतला. सईद दहशतवादी आहे. त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. खटला संपूर्ण ताकदीने चालवावा, अशी प्रतिक्रिया अमेरिकी सरकारने दिली आहे.  


संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत हाफिझ सईदचा समावेश आहे. सईद संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करतो. आम्ही आमची चिंता पाकिस्तानकडे व्यक्त केली आहे. सईदच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे आम्हाला वाटते. आम्ही त्याला दहशतवादी मानतो. २००८ मधील मुंबई हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात काही अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाला होता, असे परदेशी विभागाच्या प्रवक्त्या हिदर नॉर्ट यांनी सांगितले.  पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजला साहेब असे संबाेधले होते. हाफिज सईद साहेबांवर कोणताही खटला नाही. त्यांच्याविरोधात खटला दाखल झाला तरच काही कारवाई होऊ शकेल, असे अब्बासी यांनी म्हटले होते. त्यावर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने पाकिस्तानसोबतचे लष्करी संबंध संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिक्रियेवर पाकिस्तानकडून अद्याप काहीही भूमिका कळवण्यात आलेली नाही.  


दावोसमध्ये पंतप्रधानांची भेट नाही

पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष शाहिद खाकन अब्बासी एकत्र येत असले तरी त्यांच्या द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनीसा ंगअधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

 

भारतीय न्यायालयात आरोपपत्र दाखल 
 राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद तसेच हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरवादी कारवाया करून सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 120 ब (गुन्हेगारी कट) आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा 1967 च्या विविध कलमांनुसार आरोप ठेवण्यात आला आहे. हाफिज आणि सलाहउद्दीन यांच्याव्यतिरिक्त ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद शहा गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शहा, गिलानीचा वैयक्तिक सचिव बशीर अहमद भट, हुरियत कॉन्फरन्सचा माध्यम सल्लागार आणि रणनीतीकार आफताब अहमद शहा, नॅशनल फ्रंट या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख नईम अहमद खान, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष फारूक अहमद दार, हुरियतच्या गिलानी गटाचा माध्यम सल्लागार मोहंमद अकबर खांडे, तेहरीक-ए-हुरियतचा अधिकारी राजा मेहराजउद्दीन कालवाल, हवाला ऑपरेटर झहूर अहमद शहा वताल तसेच कामरान युसूफ आणि जावेद अहमद भट या दगडफेक करणाऱ्या दोघांचा समावेश आहे.


एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, छाप्यांत जप्त करण्यात आलेली कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे यांची छाननी आणि विश्लेषण करण्यात आले. हुरियतचे नेते, दहशतवादी आणि दगडफेक करणारे लोक हे सुनियोजित कट रचून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याचे तसेच हिंसाचाराला फूस लावत असल्याचे या तपासात आढळले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा पाठिंबा, सहभाग आणि निधी यांच्या मदतीने भारत सरकारच्या विरोधात कट रचण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...