आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Hearing The News Of The Press Conference, The Chief Justice Had Left The Chair

पत्रकार परिषदेची बातमी ऐकून सरन्यायाधीशांनी मध्येच खुर्ची सोडली; म्हणाले, कामकाज स्थगित!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली.  चार न्यायमूर्ती ( न्यायमूर्ती चेलमेश्वर, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ, न्या. रंजन गोगोई) प्रोटोकॉल तोडून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्या दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी करत होते. पाहता-पाहता काही वेळातच संपूर्ण घटनाक्रम दूरचित्रवाणीवरील सनसनाटी बातमीमध्ये रूपांतरित झाला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारद्वारे एक चिठ्ठीने सरन्यायाधीशांपर्यंत त्याबद्दलची माहिती कळवण्यात आली. त्या वेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा सहकारी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्यासोबत एक महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी घेत होते, परंतु माहिती मिळताच तिन्ही न्यायमूर्ती आपल्या खुर्चीवरून उठले. तूर्त काही वेळासाठी खटल्याची सुनावणी स्थगित करण्यात आल्याचे सरन्यायाधीशांनी पक्षकारांना सांगितले. त्यानंतर ते आपल्या दालनात निघून गेले. अशाच प्रकारचा घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायालयांतही पाहण्यास मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्सुनावणी मध्येच स्थगित झाली.  दुपारी सव्वादोन वाजता सरन्यायाधीश व त्यांचे सहकारी न्यायमूर्ती न्यायालय क्रमांक-१ मध्ये दाखल झाले व त्यांनी आपले कामकाज सुरू केले. त्याशिवाय मात्र इतर न्यायालयात न्यायमूर्ती आसनस्थ नव्हते.  


सरन्यायाधीश व दोन न्यायमूर्तींकडून सुनावणी  
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत न्यायमूर्तींची आणीबाणीची बैठक बोलावली होती. चारही न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद टीव्हीवर बघितली. त्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतील, अशी अफवा पसरली.  

- अर्थातच ही बातमी खोटी ठरली. दुपारी २ नंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशिवाय अन्य एका न्यायालयात न्यायमूर्ती सुनावणी घेत होते. तेथे न्यायमूर्ती आदर्श गोयल व न्यायमूर्ती यू.यू. ललित आपले कार्य करताना दिसून आले. इतर न्यायालयात न्यायमूर्ती आसनस्थ नव्हते.  


क्षणाक्षणाला बदलत जाणारा इत्थंभूत घटनाक्रम
> सकाळी : १०.१५ - 
चारही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांसमोर मांडले म्हणणे  
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, सकाळी १०.१५ च्या सुमारास जे. चेलमेश्वर, न्यायमूर्ती एम. बी. लोकुर, न्या. रंजन गोगोई व न्या. कुरियन जोसेफ खटल्यांचे न्यायमूर्तींमध्ये वाटप करण्याची प्रक्रिया योग्य नसल्यावरून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना भेटण्यास गेले. त्यांच्याकडे आपली चिंता व्यक्त केली. मात्र, सरन्यायाधीश आमच्या तर्कावर सहमत झाले नाहीत. त्यांनी आमच्याकडे कानाडोळा केला.  


> सकाळी १०.३० - न्यायमूर्तींनी खटल्यांची सुनावणी सुरू केली 
त्यानंतर साडेदहा वाजता सरन्यायाधीशांची भेट घेणाऱ्या चारही न्यायमूर्तींनी आपापल्या न्यायालयात विविध खटल्यांची सुनावणी सुरू केली. मात्र, बहुधा त्या वेळी त्यांच्या मनात काही वेगळेच सुरू होते. दुपारी ११ वाजण्यापूर्वी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी सुनावणी स्थगित करून ते न्यायालयातून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. कुरियन जोसेफ, न्या. एम. बी. लोकुर यांनीही त्यांचे अनुकरण केले.  


> ११.०० वाजता- चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद 
११ वाजून ५ मिनिटाला एका दक्षिण भारतीय पत्रकाराकडे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आपल्या निवासस्थानी अन्य तीन वरिष्ठ न्यायमूर्तींसह पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पोहोचली. तेव्हा प्रसारमाध्यमांत ही माहिती वाऱ्यासारखी पसरली.त्याचा उद्देश माहिती मिळाल्याने ती अफवेच्या रूपानेही पसरली.त्यानंतर न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अफवा असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळाने बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले.  


>  दुपारी १२.४५ - माध्यमांसमोर आले, २० मिनिटांत पत्रकार परिषद संपली  
न्यायमूर्ती चेलमेश्वर, न्या. लोकुर, न्या. गोगोई व न्या. कुरियन जोसेफ दुपारी सव्वाबाराच्या सुमारास प्रसारमाध्यमांसमोर आले. लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. न्यायपालिकेत सर्व काही आलबेल नसल्याचे  वक्तव्य त्यांनी केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून न्यायमूर्तींमध्ये खटल्यांचे वाटप करण्याची प्रक्रिया मनमानी स्वरूपाची आहे, असे त्यांचे म्हणणे होते.त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पत्रकार परिषद २० मिनिटे चालली.  

 

> १ वाजता - न्या. चेलमेश्वर निवासस्थानी गेले  
पत्रकार परिषद संपल्यानंतर न्यायमूर्ती चेलमेश्वर निवासस्थानी गेले. चारही न्यायमूर्तींनी न्या. चेलमेश्वर यांची त्यांच्या घरी स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली आणि ते माघारी परतले. घराबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झालेली बघायला मिळाली. दुपारी सव्वाच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती एस.ए. बोबडे व न्या. एल. नागेश्वर रावदेखील न्या. चेलमेश्वर यांच्या घरी जाऊन भेटले. ही चर्चा अर्धा तास चालली.  


> सायंकाळी-४ - भाकप नेते डी. राजा  न्यायमूर्ती चेलमेश्वर यांना भेटले  
प्रकरणाला राजकीय वळण लागले. सायंकाळी ४ च्या सुमारास न्यायमूर्ती चेलमेश्वर यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी भाकपचे नेते डी. राजा भेटले. ही भेट १० मिनिटे चालली. सायंकाळी उशिरा हितचिंतकांचे येणे-जाणे सुरू होते.  

 

हेही वाचा,
> SCने महाराष्ट्राकडून जज लोया यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला, म्हणाले- प्रकरण अतिशय गंभीर
> वाचा, 4 न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातील ठळक मुद्दे
> ज्युडीशिअरीसाठी काळा दिवस, आता प्रत्येकजण कोर्टाच्या निर्णयावर शंका घेईल : उज्ज्वल निकम
> इतिहासात प्रथमच मीडियासमोर येणारे हे आहेत 4 न्यायाधीश, न्यायव्यवस्थेतील अनागोंदीवर ठेवले बोट
> सुप्रीम कोर्टातील 4 न्यायमूर्ती ज्यांच्याबाबत बोलले, जाणून घ्या त्या चीफ जस्टिस दीपक मिश्रांबाबत..

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सरन्यायाधीश Vs न्यायमूर्ती...

बातम्या आणखी आहेत...