आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला आशा होती की विरोधी आमदार आम्हाला साथ देतील, जनादेश काँग्रेसच्या विरोधात - शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटक निवडणूक निकालानंतर आणि तिथे सरकार स्थापन करणे, येदियुरप्पांचा राजीनामा या घटनाक्रमानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा प्रथमच मीडियासमोर आले. शहा म्हणाले, कर्नाटकाचा जनादेश काँग्रेसविरोधात आहे. त्यासोबतच काँग्रेस-जेडीएस आघाडीही अनैतिक आहे. ते म्हणाले, काँग्रेस-जेडीएसने अजुनही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये बंद केलेले आहे. त्यांना जर बाहेर सोडले असते आणि ते आपापल्या मतदारसंघात गेले असते तर जनतेनेच त्यांना सांगितले असते की जनादेश कोणाच्या बाजूने आहे. घोडेबाजाराच्या आरोपावर शहा म्हणाले, काँग्रेसने तर पूर्ण तबेलाच विकून टाकला. कर्नाटकात भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला होता. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र बहुमत चाचणीला सामोरे न जाताच येदियुरप्पांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. बुधवारी जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

 

जिथे भाजप कमकुवत, तिथेच जेडीएस विजयी 
- अमित शहा म्हणाले, कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसच्या विरोधात जनादेश दिला आहे. जिथे भाजप कमकुवत होती अशाच ठिकाणी जेडीएसचा विजय झाला आहे. जिथे आम्ही भक्कम होतो तिथे आम्हीच विजयी झालो. कर्नाटकातील जनादेश हा काँग्रेस विरोधी आहे. मुख्यमंत्री स्वतः एका जागेवर पराभूत झाले आहेत. दुसऱ्या ठिकाणाहून फार थोड्या मताने त्यांचा विजय झाला. 
- शहा म्हणाले, काही लोक अपप्रचार करत आहे की भाजपकडे बहुमत नसताना कशासाठी सरकार स्थापनेचा दावा केला?  कोणाकडेच पूर्ण बहुमत नव्हते, मग काय पुन्हा निवडणूक घ्यायची का? सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचा अधिकार भाजपचा होता. जर आम्ही दावा केला नसता तर कर्नाटकाने दिलेल्या जनादेशानुसार काम झाले नसते. 104 जागा आमच्याकडे असताना आणि विशेषतः काँग्रेसच्या विरोधात जनादेश मिळाल्यानंतर आम्ही दावा केला, त्यात काहीही गैर नव्हते.

 

गोवा-मणिपूरमध्ये काँग्रेस नेते आराम करत होते, आम्ही दावा केला 
- गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपकडे कमी जागा असताना त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याचा दाखला वारंवार दिला जात होता. त्यावर शहा म्हणाले, जेव्हा आम्ही दावा केला तेव्हा काँग्रेसचे लोक आराम करत होते. आम्ही दावा केला, त्यावर राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित केले होते. तिथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून त्यांनी दावा केला नव्हता. राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला, म्हणजे आम्हाला बोलावले आम्ही यशस्वी सरकार स्थापन केले. 

 

काँग्रेस 122 वरुन 78 जागांवर आल्याचा आनंद साजरा करत आहे 
शहा म्हणाले, आज जेव्हा काँग्रेस आणि जेडीएस सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आले तेव्हा जनतेला आनंद झालेला नाही. फक्त काँग्रेस आणि जेडीएसलाच आनंद झाला आहे. काँग्रेस कशाचा आनंद साजरा करत आहे, असा सवाल करत शहा म्हणाले, काँग्रेसच्या 122 जागा होत्या त्या या निवडणुकीत 78वर आल्या. याचा त्यांना आनंद झाला आहे. मंत्री, मुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. काँग्रेस कशाचा आनंद साजरा करत आहे ? जेडीएसच्या उमेदवाराची 80 जागांवर जमानत जप्त झाली आहे. 38 जागा जिंकल्याचा त्यांना आनंद होत आहे? 

 

कर्नाटकात काँग्रेसने सर्व हद्द पार केली 
- मी तुम्हाला सांगतो, कर्नाटक निवडणूक कशी झाली. काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. प्रांतवाद, भाषा, झेंडा, धर्माच्या विभाजनाचा मुद्दा, लिंगायताना विशेष दर्जा, दलितांना भडकवण्याचा प्रयत्न झाला, पैशांचा पाऊस पाडण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात तर एवढा पैसा ओतला गेला की त्यामध्ये 10 विधानसभांमध्ये निवडणूक झाली असती. बनावट आयकार्ड तयारी करण्याचा तर कारखानच सापडला. लाखो लोकांची यादी सापडली. त्यांचे आमदार आणि नगरसेवकावर एफआयआर दाखल झाला. व्हीव्हीपॅट मशीन कचऱ्यात सापडली. हे सर्व करुनही काँग्रेस म्हणते की आम्ही निवडणूक जिंकलो. 

 

राहुल गांधी आणि विरोधक 2019 जिंकणार नाही 
- शहांना विचारण्यात आले की राहुल गांधी विरोधकांना सोबत घेऊन भाजपला पराभूत करणार असे म्हणतात. त्यावर त्यांचे उत्तर होते, विरोधक आणि काँग्रेस यांनी 2014 मध्येही एकत्र येऊन भाजपला हरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्ही जिंकलो. कर्नाटकात ममता बॅनर्जी काय करतील? पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधी काय करतील? ते काहीही म्हणत असले तरी 2019 मध्ये आम्हीच जिंकणार आहोत. मी सुरुवातीपासून राहुल गांधींच्या आरोपांवर बोलत नाही, वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ. 

 

काँग्रेसचा आरोप- मोदी आणि शहा काळ्याधानेच कुबेर, सकाळ-संध्याकाळ फक्त खोटेच बोलणार 
- काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, 'कर्नाटकात एका हॉटेलमध्ये आमचे आमदार ओलिस ठेवले होते. पोलिसांनी जाऊन त्यांना सोडवून आणले. त्यानंतर रिसॉर्टमध्ये लावलेली सुरक्षा हटवण्यात आली. ते आमच्यावर हॉर्स ट्रेडिंगचे आरोप करत आहेत.'
- भाजपने कर्नाटक निवडणुकीत किती पैसा खर्च केला याचाही उल्लेख शर्मांनी केला. ते म्हणाले, 'भाजपने कर्नाटक निवडणुकीत 6500 कोटी रुपये खर्च केले. प्रत्येक उमेदवाराला त्यांनी 20-20 कोटी रुपये दिले होते. उर्वरित 4 हजार कोटी रुपये त्यांनी आमदरांच्या खरेदीसाठी ठेवले होते. हा पैसै कुठून आला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा दुतोंडीपणा भारतीयांच्या लक्षात आला आहे. ते स्वतःच काळ्याधनाचे कुबेर आहेत. भारतीय संस्कृतीच्या बाता करतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त खोटे बोलत राहातात.' 
- 'गोव्यात काय झाले होते? जशी संधी मिळेल तसे सरकार स्थापन करा, हेच यांचे धोरण आहे. हे देशातील असे पहिले सरकार आहे, ज्यांनी राज्यातील सत्तेवर डल्ला मारला आहे. आणि आमच्यावर तबेला विकल्याचा आरोप करतात. अरुणाचलमध्ये यांच्याकडे आमदार कुठून आले?'

बातम्या आणखी आहेत...