आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेवारगी/नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी अवधीत सैन्यदल सज्ज करू शकतो, या विधानावर राहुल यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. भारतीय सैन्यदलाचा हा अपमान आहे, असे राहुल म्हणाले. हे वक्तव्य दु:खद आहे. आपल्या जवानांनी देशासाठी प्राण दिले.
सीमेवर ते अहोरात्र तैनात आहेत. त्या प्रत्येक सैनिकाचा अपमान भागवत करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे की, भागवतांनी भारतीय सैन्याची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी केलेली नाही. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास विरोधक करत आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या मते, नौदल, लष्कर आणि वायुसेना ही भारतीय अभिमानाचे प्रतीक असून भागवतांनी आपली चूक कबूल केली पाहिजे. भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी देऊन काम करणाऱ्या सैनिकांचा अपमान करणाऱ्या भागवतांनी केलेले वक्तव्य राष्ट्रध्वजाचाही अपमान असल्याचे ट्विट राहुल गांधींनी केले.
देशाच्या सुरक्षेबाबत वाद का? : नितीश
या विधानावर प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘मी याबाबत काय म्हणू्? एखादी संघटना देशाच्या सुरक्षेसाठी पुढे येत असेल, तर ताे वादाचा विषय कसा हाेऊ शकताे?’ असे म्हटले अाहे.
रिजिजूंनी भागवतांचा केला बचाव
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मोहन भागवत यांचा बचाव केला. तृणमूल काँग्रेसने रिजिजूंवर टीका करत म्हटले की, ते संघाचे मंत्री आहेत. गृह राज्यमंत्री रिजिजू यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसने भारतीय सैन्य दलावरून आता राजकारण करू नये असे ते म्हणाले. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ६-७ महिने लागतात, इतकेच भागवतांना म्हणायचे होते. घटनेने मान्यता दिली तर स्वयंसेवकही राष्ट्राचे रक्षण करू शकतात. संघाची ती क्षमता आहे.
सामान्य माणूस, स्वयंसेवकांमधील फरक सांगितला : मनमोहन वैद्य
बिहारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेत भागवतांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले. संघ ३ दिवसांत सैन्य उभे करू शकतो. हेच काम लष्कर ६-७ महिन्यांत करते. ही संघाची क्षमता आहे. देशावर तसे संकट आलेच तर स्वयंसेवक सीमेवरही जातील. घटनेने परवानगी दिली आणि परिस्थिती तशी असेल तर हे शक्य आहे, असे भागवत म्हणाले. भागवतांनी सामान्य नागरिक व स्वयंसेवकांमधील फरक सांगण्यासाठी असे म्हटले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले. भारतीय सैन्याशी त्यांना तुलना करायची नव्हती, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.