आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसशी आघाडी करण्यावरून माकपच्या नेत्यांमध्ये मतभेद; पॉलिट ब्युरोची बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हटवण्यासाठी काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावर माकपच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही.  


पॉलिट ब्युरोच्या दोन दिवसांच्या बैठकीत दोन टिपणांवर चर्चा झाली. पहिले टिपण सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी तर दुसरे टिपण माजी सरचिटणीस प्रकाश कारत यांनी सादर केले होते. या टिपणांत माकपने आगामी तीन वर्षांत कुठली राजकीय भूमिका घ्यावी याबद्दल काही सूचना करण्यात आल्या होत्या. आता पक्षात आघाडीच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने हा मसुदा केंद्रीय समितीसमोर ठेवला जाईल. केंद्रीय समितीची बैठक १९ ते २१ जानेवारीदरम्यान कोलकाता येथे होणार आहे, अशी माहिती पक्षातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नसले तरी पॉलिट ब्युरोचे काही सदस्य एकमत घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असेही निवेदनात म्हटले आहे.  


येचुरी यांनी पॉलिट ब्युरोला दिलेल्या टिपणात म्हटले आहे की मोदी सरकार हटवण्यासाठी सर्व गैर-डाव्या पक्षांचे सहकार्य पक्षाने घ्यायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विरोधात धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्याच्या दृष्टीने काँग्रेसशी राजकीय युती न करण्याचे कलम मसुद्यातून हटवायला हवे. या भूमिकेला कारत यांच्या गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. कारत यांच्या गटाचे पॉलिट ब्युरोमध्ये वर्चस्व आहे.  


विद्यमान राजकीय परिस्थितीत भाजप हा आपला प्रमुख विरोधक आहे आणि जातीयवादी शक्तींना पराभूत करणे याला पक्षाचे प्राधान्य असावे, पण काँग्रेससोबत राजकीय समझोता करू नये, यावर कारत यांच्या टिपणात भर देण्यात आला आहे, असे समजते.

 

सोनिया गांधी काँग्रेसला मार्गदर्शन करत राहतील 
सोनिया गांधी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होणार असल्या तरी त्या पक्षाला मार्गदर्शन करत राहतीलच, शिवाय परिणामकारक भूमिकाही बजावतील, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोइली यांनी वृत्तसंस्थेला दिली. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लढा देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात सोनिया गांधी काही भूमिका बजावतील का,या प्रश्नावर मोइली म्हणाले की, सोनिया गांधी यांनी २००४ आणि २००९ मध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्यातही त्या अशीच भूमिका बजावतील.

बातम्या आणखी आहेत...