आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वढेरांच्या सहकाऱ्याच्या मालमत्तांवर ‘ईडी’चे छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बिकानेरमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फरिदाबाद येथील महेश नागर यांच्या मालमत्तांवर शुक्रवारी छापे टाकले. नागर हे रॉबर्ट वढेरा यांचे सहकारी आहेत, असे म्हटले जात आहे.  


ईडीच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासूनच नागर यांच्या महेशनगरमधील मालमत्तांवर छापे टाकले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागर हे मे. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. शी संबंधित असून ही कंपनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे.  


ईडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागर यांचे जवळचे सहकारी अशोककुमार आणि जयप्रकाश बागरवा यांना अटक केली होती. ईडीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अशोककुमार आणि बागरवा या दोघांच्याही मालमत्तांवर छापे टाकले होते. नागर हे राजस्थानमधील बिकानेर येथील जमीन खरेदीच्या चार प्रकरणांत ‘अधिकृत प्रतिनिधी’ होते. अशोककुमार यांनी दुसऱ्याचे ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ वापरून याच भागात जमीन खरेदी केली होती.  नागर यांच्या कंपनीने काही वर्षांपूर्वी बिकानेरच्या कोलायत भागात २७५ बिघे जमीन खरेदी केली होती. सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...