आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्लीच्या तख्ता’वरही दुमदुमला शिवाजीराजांचा जयघाेष; राजधानीत यंदा प्रथमच भव्य शिवजयंती साेहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती-घोडे, मावळे, नऊवारी साडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा गर्जनेने साेमवारी राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला.  निमित्त हाेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे...


महाराष्ट्र सदनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या सभागृहात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला.  


कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे यांनीही महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर महाराष्ट्र सदनातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारीसमोर  वेशभूषेतील अष्टप्रधान मंडळ आणि सांप्रदायिक भजनी मंडळींचा सहभाग होता. ढाेल-ताशा- झांज पथकाचा गजरही हाेता.


संसदेतही अभिवादन  
 सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.


शिवाजी महाराज उत्तम राज्यशासक : राष्ट्रपती
‘छत्रपती शिवरायांची प्रतिमा मला अाज भेट देण्यात अाली. या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनात जी कमतरता मला अनेकदा जाणवत होती ती पूर्ण झाली,’ अशा भावना राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी व्यक्त केल्या. दिल्लीत प्रथमच साजऱ्या झालेल्या शिवजयंती साेहळ्यात ते बाेलत हाेते. या कार्यक्रमास लष्करप्रमुख बिपिन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा हेही उपस्थित होते. ‘केवळ ५० वर्षांच्या अायुष्यात भारतीय इतिहासाला निर्णायक योगदान देणारे शिवाजी महाराज हे उत्तम राज्यशासक हाेते’, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...