Home | National | Delhi | Indian economy will grow faster than China

चीनपेक्षा तेजीने वाढणार भारतीय अर्थव्यवस्था; यंदा ७.२ % पुढील वर्षी ७.४% विकासाचा अंदाज

वृत्तसंस्था | Update - May 09, 2018, 05:56 AM IST

अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आल्याने चालू वर्षात भारताचा आर्थिक विकास दर चीनला मागे टाकत पुन्हा अव्वलस्थानी जाणार आहे. प

  • Indian economy will grow faster than China

    नवी दिल्ली - अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आल्याने चालू वर्षात भारताचा आर्थिक विकास दर चीनला मागे टाकत पुन्हा अव्वलस्थानी जाणार आहे. पुढील वर्षी तर या दोन्ही देशांच्या विकास दरातील अंतर एक टक्क्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ताज्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.


    संयुक्त राष्ट्राच्या “इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फाॅर एशिया अँड द पॅसिफिक’ (ईएससीएपी) २०१८ च्या आज जारी झालेल्या अहवालानुसार वर्ष २०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के आणि पुढील वर्षी ७.४ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या समान वर्षात चीनचा विकास दर अनुक्रमे ६.६ टक्के आणि ६.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

    भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर तसेच बँका आणि उद्योग जगताची बॅलन्सशीट कमजोर झाल्यामुळे मंदी आली होती. मात्र, आता यामध्ये सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळेच भारताचा विकास दर पुन्हा जगातील सर्वाधिक राहण्याचा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे.


    जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर १० डॉलर प्रतिबॅरल वर पोहोचल्यामुळे भारताच्या विकास दरात ०.२ ते ०.३ टक्क्यापर्यंतची घट होण्याची शक्यता असल्याचे मतही या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तेजीने सुधारणा होत असून पुढील वर्षीही यामध्ये तेजीने सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात वर्ष २०१७ मध्ये विकास दर चांगला राहिला असून पुढील काळातही तेजी राहील.

Trending