आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडात 20 हजार कोटींचे संरक्षणविषयक औद्योगिक क्षेत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ / नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात २० हजार कोटी रुपये खर्च करून संरक्षणविषयक आैद्योगिक क्षेत्र तयार होणार आहे. आग्रा ते अलीगड, लखनऊ, झासी व चित्रकूट पर्यंत त्याचे क्षेत्र असेल. त्यामुळे सुमारे अडीच लाख लोकांना राेजगार मिळणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊमध्ये बुधवारी केली. दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणूकदार संमेलन-२०१८ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.


मोदी म्हणाले, संरक्षण आैद्योगिक क्षेत्र केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गेलो होते. तेथील सरकारने ट्रिलियन डॉलर (सुमारे ६५ लाख कोटी रुपये) अर्थव्यवस्था तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मला वाटते, उत्तर प्रदेशने महाराष्ट्राशी याबाबतीत निकोप स्पर्धा केली पाहिजे. ही स्पर्धा जेवढी जास्त होईल. तेवढी गुंतवणूक वाढत जाईल, असे मोदी म्हणाले. 

 

माेदी यांनी दिला '४ पी' चा मंत्र

पंतप्रधान म्हणाले, प्रोग्रेस म्हणजे चार पी. अर्थात ‘पी’- पोटेन्शियल, पॉलिसी, प्लॅनिंग व परफॉर्मन्समधूनच प्रगती साध्य होऊ शकते. आता उत्तर प्रदेशही परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे. आता राज्यात रेड टेप नव्हे तर रेड कार्पेट असेल. कुशीनगर व जेवरमध्ये दोन नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवले जात आहेत. ११ शहरांत विमानतळांचा विकास केला जात आहे. मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्या कामाचे कौतुक केले.

 

अंबानी १४ हजार नोकऱ्या देणार

- मुकेश अंबानी , रिलायन्स उद्योग :  वीस हजार कोटी गुंतवणूक.तीन वर्षांत आणखी १४ हजार कोटींद्वारे १४ हजार नोकऱ्या देणार. 
- गौतम अदानी, अदाणी समूह : पाच वर्षांत ३५, ००० कोटींची गुंतवणूक करणार. 
- कुमार मंगलम बिर्ला,  आदित्य बिर्ला:  २५, ००० कोटींच्या गुंतवणुकीतून आरोग्य केंद्र, बालिकाश्रम.

- आनंद महिंद्रा, महिंद्रा समूह  : इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प सुरू करणार. 

 

तीन वर्षांत ४० लाख रोजगार
योगी सरकारच्या कार्यकाळातील हे गुंतवणूकदारांचे पहिलेच संमेलन आहे. नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यातून राज्याचा आर्थिक चेहरा बदलण्याचेही उद्दिष्ट आहे. तीन वर्षांत ४० लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षणविषयक दोन आैद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केली होती. त्या अंतर्गत बुंदेलखंडमध्ये तो प्रत्यक्षात आला आहे.

 

१८ केंद्रीय मंत्री, ७ देशांच्या प्रतिनिधींसह ६ हजार पाहुणे सहभागी

संमेलनात १८ केंद्रीय मंत्री, उद्योगपतींसह ६ हजारांवर पाहुणे सहभागी झाले. फिनलँड, नेदरलँड, जपान, झेक गणराज्य, थायलंड, स्लोव्हाकिया, माॅरिशस इत्यादी सात देशांचे प्रतिनिधी, उद्योगपती या संमेलनात सहभागी होण्यासाठी लखनऊमध्ये आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...