आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेर्टाचा मासळी बाजार नकाे, न्या.चंद्रचूड हे वक्तव्य मागे घ्यावे : मच्छीमार संघटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / पुद्दुचेरी- न्यायालयाला मासळी बाजार बनवू नये, असे वक्तव्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान केले होते. यावरून आता वादंग उठले आहे. मासेमारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या नॅशनल फिशरफोक फोरमने न्या. चंद्रचूड यांनी वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे.    


न्या. चंद्रचूड यांना मासळी बाजाराचा उल्लेख करण्याची गरज का पडली, मासळी बाजार इतका वाईट असतो का, असे प्रश्न पुद्दुचेरीतील या संघटनेने उपस्थित केले आहेत. न्यायमूर्तींच्या वक्तव्यामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. न्या. लोया मृत्यू प्रकरणात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान वकिलांच्या वादविवादामुळे नाराज होऊन न्या. चंद्रचूड यांनी वरील वक्तव्य केले होते. नॅशनल फिशरफोक फोरमचे अध्यक्ष एम. इलांगा म्हणाले की, माननीय न्या. चंद्रचूड यांच्या वक्तव्यामुळे मासेमारी करणाऱ्या समुदायाचा अपमान झाला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नसताना चुकीच्या पद्धतीने आमचा उल्लेख करण्यात आला. न्यायमूर्तींना मासळी बाजार म्हणण्याची गरज का पडली याबद्दल आम्ही जाणू इच्छितो.  मासळी बाजार आणि आमची प्रतिमा खराब करण्याएवढे आम्ही वाईट नाही. 

 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा आम्ही आदर करतो, पण मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्यांचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे एम. इलांगा म्हणाले. न्या. चंद्रचूड यांनी जेथे हे वक्तव्य केले होते तेथेच त्यांनी वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीत उल्लेख  
न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टात ५ फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. युक्तिवादादरम्यान मुंबई वकील संघटनेकडून बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी आक्षेप नोंदवला होता. यानंतर दवे आणि शिसोदिया यांच्यात बराच वादविवाद झाला. न्या. चंद्रचूड यांनी मध्यस्थी केली. पण दवे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावर नाराजी व्यक्त करत न्या. चंद्रचूड यांनी न्यायालयाला मासळी बाजार करू नका, असे वक्तव्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...