आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती म्हणाले, आई-वडील संपत्ती कमावतात अन‌् मुले ती वकिलांच्या शुल्कावर खर्च करतात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मालमत्तेच्या वादावरून न्यायालयात खटला दाखल होण्याची अनेक प्रकरणे आहेत. हैदराबादमध्येही एका मोठ्या उद्योग समूहाशी  संबंधित कुटुंबाने मालमत्तेचा वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने वृद्ध महिला आणि तिच्या तीन मुलींना १० जानेवारीपर्यंत एकत्र राहण्यास सांगितले. त्यानंतरच पुढील सुनावणी केली जाईल. आई-वडील अपत्यांसाठी कष्टाने मालमत्ता कमावतात. पण अपत्ये मालमत्ता वकिलांची फीस भरण्यात गमावतात. कुटुंबातील प्रत्येकाने याचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.   


न्यायमूर्ती कुरियन म्हणाले, पैसा, मालमत्तेसाठी तुम्ही कुटुंबातील प्रत्येकाला सोबत राहणे शिकवणार की एकमेकांविरुद्ध लढणे? ज्येष्ठांच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी तरी भांडण थांबवायला हवे आणि एकत्र राहावे. सध्या न्यायालयीन व्यवस्थेत नवीन पायंडा पडत आहे. पालकांचा पैसा वकिलांवर खर्च केला जाताे ही बाब बुद्धीला पटणारी नाही. कुटुंबाला एकत्र आणण्यात खोडा ठरणाऱ्या शक्तींना (न्यायालयाचा इशारा वकिलांकडे) दूर ठेवण्यास न्यायालयांनीही प्रयत्न करायला हवा.   


हैदराबादमधील एका औषध कंपनीच्या अधिकारावरून एक विधवा महिला आणि तिच्या तीन मुलींमध्ये वाद सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुलींनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने खटल्यातील पक्षकार आणि वकिलांनी १० जानेवारीपर्यंत एकमेकांशी संपर्क करू नये, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, अभिषेक मनू सिंघवी, श्याम दिवाण, पी. चिदंबरम, व्ही. गिरी आणि बी. आदिनारायण बाजू मांडत आहेत. उच्च न्यायालयाने कंपनी कायद्यानुसार आपला निकाल दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले. परंतु वास्तवात हा वाद कौटुंबिक कलहातून निर्माण झाला असून आता मालमत्तेपर्यंत गेला आहे. 

 

 न्यायमूर्ती मुलांना म्हणाले, आईसोबत एक तास तरी घालवा  

 

सुनावणीवेळी न्यायमूर्ती कुरियन तिन्ही मुलींना म्हणाले, तुम्ही आईला किती वेळ दिला? त्यातील एका मुलीने खूप वर्षांपूर्वी एकमेकांना वेळ दिला होता, असे उत्तर दिले. यावर न्यायमूर्तींनी खोली क्र.१५ मध्ये जा आणि मालमत्तेचा विषय न काढता एक तास गप्पा मारून या, असे म्हटले. विधवा महिला, तिन्ही मुली, दोन नातींनी दोन तास वेळ दिला. गैरसमजातून आजवर बरेच वाद झाल्याचे सर्वांनी मान्य केले. दोन्ही पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद पाहता कुरियन यांनी १० जानेवारीपर्यंत सोबत राहण्यास वेळ दिला.

बातम्या आणखी आहेत...