आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएईत मंदिराचे भूमिपूजन करणार; ओमानमध्ये शिव मंदिरातही जाणार; मोदी चार देशांच्या दौऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/रामल्ला- पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते  जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला भेट देणार आहेत. त्यांचा हा दौरा ऐतिहासिक आहे. ते यूएईत एका मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याशिवाय ओमानमध्ये १०० वर्षे जुन्या शिवालयात दर्शन घेतील, त्याचबरोबर मशिदीतही जातील. मोदी या आखाती देशांशी अनेक महत्त्वाचे करार करणार आहेत.


पंतप्रधान मोदी ९ फेब्रुवारीला जॉर्डनला पोहोचले. तेथे त्यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली. मोदी यांनी या दौऱ्याआधी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, आखाती देश आणि पश्चिम आशियातील देश यांच्यासोबतचे संबंध आणखी दृढ करणे हा या दौऱ्याचा हेतू आहे. २०१५ नंतरचा माझा हा आखाताचा पाचवा दौरा आहे. या चारही देशांनी भारताचे चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. या दौऱ्यामुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे.


आखाती देश हे भारताचे व्यूहात्मक भागीदार देश आहेत, असे वर्णन करून मोदींनी म्हटले आहे की, भारताचे संयुक्त अरब अमिरातीशी अर्थव्यवस्था, ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान आणि सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चांगले सहकार्य आहे. तेथील शेख मोहमद बिन राशिद अल मकतौम, उपाध्यक्ष आणि पंतप्रधान तसेच दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान व युवराज यांच्याशी चर्चा करणार आहे. दुबईत जागतिक सरकारांची ६ वी शिखर परिषद होणार असून, त्यात भारत प्रमुख अतिथी आहे. मोदी या परिषदेलाही संबोधित करतील. या परिषदेत यूएई आणि अरब देशांतील प्रमुख कंपन्यांच्या सीईओंशी ‘भारतातील आर्थिक संधी ’ या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.


मोदी ओमानला ११ आणि १२ फेब्रुवारीला भेट देणार आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा ओमानचा पहिलाच दौरा आहे. तेथे ते ओमानचे सुलतान आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ओमानच्या प्रमुख उद्योगपतींशी भारतासोबतचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यावर या वेळच्या चर्चेत भर देण्यात येईल, अशी माहिती मोदींनी दिली.

 

पॅलेस्टाइनला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पॅलेस्टाइनला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तेथे आपण पॅलेस्टाइनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याशी चर्चा करणार आहोत. या दौऱ्यात पॅलेस्टाइनच्या नागरिकांना आणि तेथील विकासाला भारताचा पाठिंबा देण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त करणार आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे.


दुबईतील हिंदू मंदिराला भेट देणार
पंतप्रधान मोदी यांचे यूएएईत व्यस्त वेळापत्रक आहे. तेथे ते यूएईच्या नेत्यांसोबतच भारतीय समुदाय, व्यावसायिक आणि भारताच्या राजदूतांशी चर्चा करणार आहेत. रविवारी ते दुबईत एका मंदिराच्या कोनशिला समारंभाला उपस्थित राहतील. भारतीय समुदायाला संबोधित करतील.

 

बातम्या आणखी आहेत...