आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेगृहांत चित्रपटाआधी राष्ट्रगीताची सक्ती नाही- कोर्ट; बदलला आपलाच निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयाने संपुष्टात आणली आहे. कोर्टाने जवळपास १४ महिन्यांपूर्वी सुनावलेल्या आपल्याच निकालात दुरुस्ती केली. राष्ट्रगीत वाजवायचे की नाही, याचा निर्णय चित्रपटगृह मालकांना घेता येईल, अशी सवलत दिली. या मुद्द्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारने स्थापलेली १२ सदस्यीय आंतरमंत्रिमंडळ समिती घेईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

 
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठाने सांगितले की, समितीचा निर्णय येईपर्यंत जर चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजत असेल तर प्रेक्षकांनी त्यांचा मान ठेवावा, अशी आशा आम्ही करतो. तसेच दिव्यांग व अशक्त व्यक्तींना उभे राहण्यापासून दिलेली सूट कायम राहील. सोमवारी केंद्राने कोर्टात शपथपत्र दाखल करून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सक्तीचे करू नये, असे सांगितले होते. याबाबत दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी आंतरमंत्रिमंडळ समिती स्थापली आहे. ती राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमान रोखण्याबाबतच्या कायद्यात बदलही सुचवणार आहे. या समितीकडून सहा महिन्यांत अहवाल मागवण्यात आला आहे. कोर्टाने श्यामनारायण चौकसे यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपले म्हणणे आंतरमंत्रिमडळ समितीसमोर मांडावे, असेही सांगितले.


> १४ महिन्यांत राष्ट्रगीतावर सुप्रीम कोर्टाच्या तीन टिप्पण्या
 

२३ ऑक्टोबर २०१७ : राष्ट्रगीतावेळी उभे न राहणारेही कमी देशभक्त नाहीत
देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहांत उभे राहण्याची गरज नाही. उभे न राहणारे लोक कमी देशभक्त नाहीत. पुढे सरकार म्हणेल की लोकांनी चित्रपट पाहायला टी शर्ट व शॉर्ट््समध्ये जाऊ नये, यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होईल. 
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए.एम.खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड


३० नोव्हेंबर २०१६ : ही आपली मातृभूमी आहे, हे लोकांनी समजून घ्यावे 
राष्ट्रगीत आपली राष्ट्रीय ओळख, एकता व देशभक्तीशी निगडित आहे. ही आपली मातृभूमी आहे, हे लोकांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. भारतीय आहात तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहण्यात अडचण नसावी. परदेशांतही सर्वच जण तेथील नियम पाळतात. 
- तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि अमिताव रॉय


९ जानेवारी २०१८ : चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे नाही
चित्रपटाआधी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे नाही. राष्ट्रगीत वाजवायचे की नाही, याचा निर्णय चित्रपटगृह मालकांच्या मर्जीवर अवलंबून असेल. राष्ट्रगीत वाजल्यास प्रेक्षकांनी त्याचा सन्मान करावा, अशी अपेक्षा करत आहोत. 
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए.एम. खानविलकर व डी.वाय. चंद्रचूड

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...