आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वस्तू, 53 सेवांवरील कर कमी, नवे दर 25 जानेवारीपासून लागू;जीएसटी कौन्सिलची 25वी बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हिरे आणि मौल्यवान रत्नांवरील कर ३% वरून ०.२५% करण्यात आला आहे. इतर वस्तूंमध्ये साखरेपासून तयार होणारे मिष्ठान्न, २० लिटर पाण्याच्या बाटल्या, मेंदीचे कोन आणि खासगी वितरकांमार्फत होणारा गॅसपुरवठा यांचा समावेश आहे. पूजेमध्ये वापरली जाणारी विभुती आणि श्रवणयंत्रातील सुटे भागही जीएसटीतून मुक्त करण्यात आले आहेत. स्वस्त होणाऱ्या सेवांमध्ये टेलिरिंग, वॉटर पार्क, थीम पार्क, जाय राइड््स आणि कातड्याच्या वस्तूंसंबंधी काम यांचा समावेश आहे. हे दर २५ जानेवारीपासून लागू होतील.


गुरुवारी कौन्सिलची २५ वी बैठक झाली. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, पेट्रोल-डिझेल आणि रिअल इस्टेटवर बैठकीत चर्चा झाली नाही. सुमारे दहा दिवसांनी होत असलेल्या पुढील बैठकीत यात चर्चा होऊ शकते. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहे. यापूर्वी १० नोव्हेंबरला गुवाहाटीत झालेल्या जीएसटी कमिटीच्या बैठकीत २११ वस्तूंवरील कर कमी करण्यात आला होता.


काही व्यापाऱ्यांनी उलाढाल कमी दाखवल्याची शंका
कंपोझिशन योजनेत १७ लाख व्यावसायिकांनी नोंदणी केली. तीन महिन्यांत केवळ ३०७ कोटी रुपये कर मिळाला. म्हणजेच काही व्यापाऱ्यांनी उलाढाल कमी दाखवली असावी, अशी शंका आहे. 
-अरुण जेटली, अर्थमंत्री


परीक्षेच्या एन्ट्रस फीला दिली करातून सूट
शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश किंवा परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपन्यांच्या सेवांवर आता जीएसटी नसेल. एन्ट्रन्स परीक्षेसाठी दिली जाणारी फीही आता करमुक्त असेल. उच्च माध्यमिकपर्यंत शाळांसाठी बस पुरवणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीस बसच्या भाड्यावर अर्थात उत्पन्नावर आता जीएसटी देण्याची गरज राहणार नाही.


१ फेब्रुवारीपासून १५ राज्यांत ई-वे बिल
एक राज्य दुसऱ्या राज्यात सामान घेऊन जात असेल तर १ फेब्रुवारीपासून ई-वे बिल आवश्यक असेल. १५ राज्यांनी याच दिवशी ते लागू करावयाचे आहे. म्हणजेच या राज्यांत ५० हजारांपेक्षा अधिक किमतीचे सामान १० किमीपेक्षा अधिक अंतरावर नेताना ई-वे बिल भरावयाचे आहे. यामुळे करचोरी थांबेल, अशी आशा जेटलींनी व्यक्त केली.


हस्तकलेत ४० वस्तू
कराचा टप्पा निश्चित करणाऱ्या समितीने हस्तकलेत समाविष्ट असलेल्या ४० वस्तू निश्चित केल्या आहेत. यात आणखी वस्तू समाविष्ट होतील. त्यावरील कर नंतर जाहीर केला जाईल.