आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिजिजू यांनी रेणुका चाैधरी यांच्या हास्याची तुलना केली शूर्पणखाशी;राज्यसभेत कल्लोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेत काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्यावरून गुरुवारी राजकारण तापू लागले आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला चढवला आहे. त्यांच्या विरोधात विशेषाधिकार नोटीस पाठवू, असा इशारा चौधरी यांनी दिला. काँग्रेसने या मुद्द्यावर राज्यसभेत गदारोळ केला. मोदींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी रामायण मालिकेतील शूर्पणखाच्या हसण्याच्या व्हिडिआेला जाहीर करून या वादाला आणखी हवा दिली.


रिजिजू यांनी या व्हिडिआेला मोदींच्या चौधरींवरील वक्तव्याशी लिंक करून पोस्ट केले. त्यामुळे वाद आणखीनच वाढला. ही कृती महिलांचा अपमान करणारी आहे, असा आरोप विरोधी पक्षांतील महिला खासदारांनी केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक आे ब्रायन यांनी नामोल्लेख न करता मोदींची तुलना महिषासूरासोबत केली. गोंधळामुळे शून्यप्रहरी कामकाज होऊ शकले नाही. महिला खासदारांनी नंतर वेंकय्या नायडू यांची भेट घेतली व पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी केली.


महिला खासदारांनी गुलाम म्हणून काम करू नये : काँग्रेस नेते विरप्पा मोईली म्हणाले, पंतप्रधानांकडून असेच भाष्य ऐकण्याची रेणुका चौधरी यांची लायकी आहे, असे काही महिला मंत्र्यांना वाटते.  पंतप्रधानांचा बचाव करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु हे भाष्य एका महिलेच्या विरोधात आहे. अशा महिला मंत्र्यांनी पंतप्रधानांचे गुलाम म्हणून काम करू नये. काँग्रेस खासदार रंजीत रंजन म्हणाले, रिजिजूंचा व्हिडिआे सूडाच्या भावनेला दर्शवतो. दुसरीकडे काँग्रेसने राज्यसभेत पक्षपातीपणे काम करू नये, सर्व सदस्यांना योग्य तो सन्मान देण्याचा आग्रह करणारा एक व्हिडिआे जारी केला. राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी हा मुद्दा एवढा ताणू नये, असा सल्ला काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला म्हणाले, रेणुका चौधरी व मणिशंकर अय्यर पक्षासाठी आेझे आहेत. त्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसची हानी झाली आहे, असा आरोप पूनावाला यांनी केला आहे. 

 

काय आहे प्रकरण

आधारचे संकल्पना अटल बिहार वाजपेयी यांची होती. ७ जुलै १९९८ मध्ये तत्कालीन गृहमंत्री अडवाणी यांनी राष्ट्रीय आेळखपत्राचा उल्लेख केला होता, असे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत सांगितले. तेव्हा रेणुका चौधरी मोठमोठ्याने हसत होत्या. सभापती नायडूंनी त्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यावर मोदी म्हणाले, माझी सभापतींना विनंती आहे. त्यांना रोखू नये. रामायण मालिकेनंतर अशा हास्याला ऐकण्याचे सौभाग्य आज मिळाले. त्यावर एकच हशा पिकला. मोदी आधारवरून काँग्रेसवर आरोप करत पण मोदींनीच यापूर्वी जाहीर सभांतून याविरोधात टीका केली होती. या विरोधाभासाचे हसू आल्याचे रेणुका चौधरी यांचे म्हणणे आहे.

 

मी दोन मुलींची आई आहे, महिलांचा आदर करण्याची काय ही पद्धत आहे ?
पंतप्रधानांकडून आणखी काय अपेक्षा करणार ? त्यांच्या विरोधात विशेषाधिकार नोटीस बजावणार आहे. आधी पक्षाशी चर्चा करेल. रिजिजू यांचा व्हिडिआे पोस्ट आक्षेपार्ह व लाजिरवाणा आहे. हे लोक महिलांचा आदराच्या गोष्टी करतात. मग महिलांचा आदर करण्याची काय ही पद्धत आहे ? मी दोन मुलांची आई आहे. पत्नी आहे आणि माझी तुलना शूर्पणखा राक्षसीसोबत केली आहे.
- रेणुका चौधरी, खासदार, काँग्रेस.

 

बातम्या आणखी आहेत...