आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळ्यामुळे पीएनबीला 13,417 कोटींचा तोटा; बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा तोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चौकसीच्या घोटाळ्यामुळे पंजाब नॅशनल बँकेला जानेवारी-मार्च २०१८ मध्ये १३,४१६.९१ कोटी रुपयांचे  नुकसान झाले आहे. देशाच्या बँकिंग इतिहासातील हा सर्वात मोठा बँकिंग तोटा आहे.

 

जानेवारी-मार्च २०१७ मध्ये पीएनबीला २६१.९० कोटी रुपयांचा नफा झाला होता. नीरव मोदी घोटाळ्यामुळे बँकेला १४,३५६.८४ कोटी रुपये इतर बँकेला देणे लागतात. बँकेने सध्या तरी याच्या अर्धी म्हणजेच ७,१७८.४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित रकमेची तजवीज २०१८-१९ च्या तीन तिमाहींत करण्यात येईल.  


मुंबई परिसरातील बँकेच्या ब्रेडी हाऊस शाखेतील कर्मचाऱ्यांनी नीरव आणि मेहुलच्या कंपन्यांना बनावटी  ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू) जारी केले होते. एसओयूच्या आधारावर दुसऱ्या बँकांनी या कंपन्यांना कर्ज दिले होते.  मार्च तिमाहीमध्ये मुदत संपणाऱ्या एलओयूच्या बदल्यात पीनबीने दुसऱ्या बँकांना ६,५८६.११ कोटी रुपये दिले आहेत. ३१ मार्चनंतर ६,९५९.७९ कोटींच्या एलआेयूची मुदत संपत आहे.  


चौथ्या तिमाहीमध्ये बँकेचे उत्पन्नदेखील १४,९८९.२२ कोटी रुपयांवरून १३.६ टक्क्यांनी कमी हाेऊन १२,९४५.६८ कोटी रुपयांवर आले आहे. जानेवारी-मार्च २०१७ मध्ये बँकेला ६,२३१.७९ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा झाला होता, तर या वेळी बँकेला ४४७.३८ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा
झाला होता.

 

८६,६२० कोटींचा एनपीए  
निव्वळ एनपीए १८.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा मार्च २०१७ मध्ये १२.५३ टक्के होता. रकमेच्या दृष्टीने हा ५५,३७० कोटी रुपयांनी वाढून ८६,६२० कोटी रुपये झाला आहे.

 

तरतुदीत चौपट वाढ  
एनपीए वाढल्यामुळे बँकेला चौपट जास्त तरतूद करावी लागली आहे. मार्च २०१७ च्या ४,९१०.३९ कोटींच्या तुलनेत बँकेने मागील तिमाहीमध्ये १६,२०२.८२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

 

२०१६-१७  चा नफा घटला
२०१६-१७ मध्ये पीएनबीने २,२०७ कोटी रुपये कमी एनपीए दाखवला असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. त्या वर्षी बँकेचा नफादेखील १,३२४.८ कोटी रुपयांवरून दुरुस्तीसह ५३२.६ कोटी रुपये करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...